सोमेश्वरनगर ! मु. सा. काकडे महाविद्यालयात 'रस्ते सुरक्षा सप्ताह' अभियान संपन्न
सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील मु. सा. काकडे महाविद्यालयात 'रस्ते सुरक्षा सप्ताह' च्या अनुषंगाने महाविद्यालयाच्या संरक्षण व सामरिक शास्त्र विभागाच्या वतीने 'रस्ते सुरक्षा व वाहतूकीचे नियम' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे व पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वाहतूक विभागाचे संतोष जावीर व करंजेपुल दुरक्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल एम. एन. साळुंखे यांनी रस्ते सुरक्षा जनजागृतीपर व्याख्यान दिले. या व्याख्यानामध्ये त्यांनी अपघात टाळण्यासाठी व सुरक्षित वाहन चालविण्याबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना काही सूचना व मार्गदर्शन केले. तसेच, नियम तोडल्यास विविध कलमांतर्गत कशाप्रकारे दंडात्मक कारवाई होऊ शकते याविषयी माहिती दिली. अपघात समयी किंवा इतर वेळी आवश्यकता भासल्यास Dial 112 हा क्रमांक वापरावा. वैद्यकीय मदती साठी सहकार्य करावे. अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करावे. अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालवल्यास पालकांवर कार्यवाही होते. असे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, सहसचिव सतीश लकडे, उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे, डॉ. जया कदम, डॉ. प्रवीण ताटे देशमुख, रवींद्र जगताप, महामार्ग सुरक्षा पथक पुणे विभाग येथील पो.ना. निलेश गायकवाड, होमगार्ड निलेश खामगळ, महाविद्यालयाच्या वरिष्ठ विभागाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संरक्षण व सामरिक शास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. आदिनाथ लोंढे यांनी केले. सूत्रसंचालन बीबीए (सीए) चे उपप्राचार्य प्रा. रजनीकांत गायकवाड यांनी केले तर डॉ. कल्याणी जगताप यांनी आभार मानले.