जयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत सुरु ; जिल्हाधिकाऱ्यांकडून अनुयायांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत
पुणे, दि.१: पेरणे येथे सकाळपासून जयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत आणि उत्साहात सुरु झाला. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी वाहनतळावर आलेल्या अनुयायांशी संवाद साधला व गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.
जयस्तंभ अभिवादनासाठी अनुयायांनी पहाटेपासून गर्दी केली होती. पोलीस प्रशासनाच्या उत्तम नियोजनमुळे अभिवादन सोहळा शिस्तीत सुरु आहे. पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी सोहळा शांततेत पार पडावा यासाठी नियंत्रण कक्षाद्वारे सीसीटीव्हीच्या माध्यमातून सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेऊन आहेत.
जिल्हा परिषदेने पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेची चांगली सुविधा केली असून आरोग्य पथकाद्वारे गरजूंना सेवा देण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी स्वतः परिसराला भेट देऊन या सर्व व्यवस्थेची पाहणी केली. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनीही भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली.
पीएमपीएमएलने लोणीकंद आणि कोरेगाव भीमा अशा दोन्ही बाजूने प्रत्येकी १४० बसेस सुरू ठेवल्या असून बसेसच्या सकाळी ११ वाजेपर्यंत सुमारे २ हजार ८०० फेऱ्या झाल्याची माहिती पीएमपीएमएलचे व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी दिली आहे.
*केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडून अभिवादन*
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनीही जयस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
तत्पूर्वी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी जयस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जि. प.चे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे उपस्थित होते.
समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनीही जयस्तंभास अभिवादन केले. यावेळी समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त बी. ए. सोळंकी, सहायक आयुक्त संगिता डावखर आदी उपस्थित होते.