Big Breaking ग्रामपंचायत निवडणूकीचा खर्च सादर करण्याचे आवाहन
खर्चाचा हिशोब प्रतिज्ञापत्रासह सादर न करणाऱ्या उमेदवारांना अपात्र
पुणे : जिल्ह्यात १८ डिसेंबर रोजी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये खर्चाचा हिशोब सादर न करणाऱ्या उमेदवारांवर अपात्रेची कारवाई सुरू करण्यात येणार असून २० जानेवारी २०२३ पर्यंत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये १८ डिसेंबर २०२२ रोजी २२१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका पार पडल्या. या निवडणूकीचा निकाल २३ डिसेंबर २०२२ रोजी जाहीर करण्यात आला आहे. या निवडणूकीमध्ये सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या २ हजार ७४ जागांसाठी ३ हजार ५३२ उमेदवारांनी निवडणूक लढविली आहे. तसेच ७६१ उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत.
निवडणूक लढविणाऱ्या व बिनविरोध निवडून आलेल्या एकूण ४ हजार २९३ उमेदवारांनी त्यांचा निवडणूकीच्या खर्चाचा हिशेब २० जानेवारी २०२३ पर्यंत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी अथवा तहसिल कार्यालयात प्रतिज्ञापत्रासह जमा करणे आवश्यक आहे. खर्चाचा हिशोब प्रतिज्ञापत्रासह सादर न करणाऱ्या उमेदवारांना अपात्र करण्याबाबतची कार्यवाही जिल्हा प्रशासनामार्फत तातडीने सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी त्यांच्या निवडणूकीच्या खर्चाचा हिशेब तातडीने सादर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी केले आहे.