जिल्हा परिषदेत नेत्रतपासणी शिबिरचे आयोजन.
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण (दिव्यांग कल्याण) विभागामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेनुसार जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा परिषद परिसरात आयोजित या शिबिरात पुणे येथील डॉ. मनोहर डोळे फाऊंडेशन यांचेमार्फत अथर्व नेत्रालयकडून मोबाईल आय क्लिनिकद्वारे नेत्र तपासणी करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन आयुष प्रसाद यांनी केले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रविण कोरगंटीवार तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
शिबिराच्या आयोजनात वरिष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. स्नेहल पाठक, वरिष्ठ प्रशासन कार्यकारी अधिकारी प्रितम वाघमारे, मंगेश चव्हाण यांचे सहकार्य लाभले. शिबिरामध्ये जिल्हा परिषदेच्या सुमारे १७० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. यातील ७५ कर्मचाऱ्यांना चष्मा आवश्यक असल्याचे दिसून आले. तर काचबिंदू १, मोतीबिंदू शत्रक्रिया आवश्यक ४, डायबिटीक रेटीनोपॅथी ४ आणि डायबेटिक रेटिनाथेरेपीसाठी २ अधिकारी/कर्मचाऱ्यांना पुढील तपासणीसाठी नेत्रतज्ज्ञांकडे शिफारस करण्यात आली.