कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सैनिकांच्या त्यागाचा सन्मान...!
सैन्यदलात सेवा बजावलेले माजी सैनिक, युद्ध, युद्धजन्य परिस्थिती, देशातील सुरक्षा संबंधी मोहिमेत, चकमकीत, देशाबाहेरील मोहीमेत दिव्यांगत्व आलेले सैनिक, धारातीर्थी पडलेल्या शहीद सैनिकांचे वारस यांच्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवून त्यांच्या त्यागाचा सन्मान करण्याचा प्रयत्न केला जातो. या विविध योजनांविषयी….
पुनर्वसन महासंचालनालय नवी दिल्ली, केंद्रीय सैनिक मंडळ नवी दिल्ली, राज्य शासन तसेच राज्य शासनाच्या सैनिक कल्याण विभागाकडून राज्य सैनिक मंडळअंतर्गत ‘कल्याणकारी निधी’ आणि राज्यपाल यांच्या अध्यक्षतेखाली गठित ‘विशेष निधी’ राज्य व्यवस्थापकीय समितीतून विविध योजना राबवल्या जातात.
*कल्याणकारी निधीतून मदत:*
*शैक्षणिक मदत*
शासनमान्य विना अनुदानित खासगी शाळेत, माध्यमिक/ उच्च माध्यमिक खासगी शाळेत, महाविद्यालयात पदवी, पदव्युत्तर, अभियांत्रिकी, वैद्यकीय व व्यवसायिक अभ्यासक्रमाचे पदवी, पदविका, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या माजी सैनिकांच्या व विधवांच्या पाल्यांना शैक्षणिक मदत दिली जाते. परराज्यात, परदेशात शिक्षण घेणाऱ्या पाल्यांनाही निकषानुसार मदत दिली जाते. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एनडीए) प्रवेश मिळालेल्या पाल्यास प्रशिक्षणासाठी पालकाच्या सैन्यसेवेतील पदानुसार सत्रशुल्काच्या ५० टक्के ते १०० टक्केपर्यंत आर्थिक अनुदान मिळते. तसेच एनडीए, भारतीय सैन्य प्रबोधिनी (आयएमए) व अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनी (ओटीए) व समतुल्य संस्थेत प्रवेश मिळाल्यास प्रोत्साहनपर ५० हजार रुपये आर्थिक मदत मिळते.
छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक, सेवापूर्व संस्था औरंगाबाद आदी समतुल्य संस्थेत प्रवेश घेतलेल्या पाल्यास प्रोत्साहनपर भत्ता व अनुदान मिळते. महासैनिक प्रशिक्षण केंद्र कोल्हापुर, बुलढाणा व मेस्को करिअर अकॅडमी सातारा येथे सुरक्षा रक्षक (सिक्युरीटी गार्ड) किंवा सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या माजी सैनिक व विधवा यांच्या पाल्यांना शुल्काच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त २ हजार पर्यंत अर्थिक मदत देण्यात येते.
सैनिक स्कूल सातारा व राष्ट्रीय भारतीय सैन्य कॉलेज डेहराडून येथे शिकणाऱ्या पाल्यास ३२ हजार व महाराष्ट्रातील शासन मान्य इतर सैनिक शाळांसाठी १५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते.
शासनमान्य खाजगी संगणकाच्या ६ महिन्याच्या अभ्यासक्रमासाठी माजी सैनिक, पत्नी, विधवा व पाल्य यांना ४ हजार, ६ महिन्यापेक्षा जास्त पण १ वर्षांपेक्षा कमी असलेल्या अभ्यासक्रमासाठी ६ हजार रुपये व १ वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी आकारण्यात आलेल्या शुल्काची रक्कम किंवा ८ हजार यापैकी जी रक्कम कमी असेल त्या रक्कमेची प्रतिपूर्ती मिळते.एमएस-सीआइटी च्या कोर्ससाठी माजी सैनिक व विधवा यांना २ हजार ५०० रुपये मदत मिळते.
*शिष्यवृत्ती व विद्यावेतन:*
दहावीत ६० टक्क्यापेक्षा जास्त गुणाने उत्तीर्ण माजी सैनिकांच्या पहिल्या १५ पाल्यांना २ हजार ५००, १६ ते ३० पाल्यांना २ हजार व ३१ च्या पुढील सर्वांना १ हजार ५०० रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. १० वी व १२ वी मध्ये ६० टक्के गुणांनी उत्तीर्ण होऊन अभियांत्रिकी व तत्सम पदविकेसाठी प्रवेश घेतलेल्या पाल्यांसाठी २ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते.
बारावीत ६० टक्के गुणासह उत्तीर्ण होऊन वैद्यकीय, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषध निर्मिती, हॉटेल मॅनेजमेंट, आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानी च्या पदवी अभ्यासक्रमास प्रवेशित पाल्यांसाठी ५ हजार रुपये व कला, वाणिज्य, विज्ञान, अध्यापक, विधी व पदविकेसाठी २ हजार ५०० रुपये, पदव्युत्तर साठी ६ हजार, पीएचडी व तत्सम संशोधन अभ्यासक्रमासाठी १२ हजार, १२ वीत ६० टक्के गुणांनी उत्तीर्ण होऊन परराज्यात शिक्षण घेणाऱ्या पाल्यास पदवीसाठी ५ हजार, पदविकेसाठी २ हजार ५०० व पदव्युत्तर साठी ६ हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते.
*विशेष गौरव:*
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या, आपत्ती काळात व राष्ट्रीय पातळीवर बहुमोल कामगिरी बजावणाऱ्या माजी सैनिकांना १० हजार रुपये व आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा उंचावणाऱ्या माजी सैनिकांना २५ हजार रुपये पुरस्कार देण्यात येतो. आयआयटी, आयआयएम व एआयआयएमएसमध्ये प्रवेश मिळवलेल्या पाल्यांना २५ हजार रुपये, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षेत ९० टक्केपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या पहिल्या ५० पाल्यांना १० हजार रुपये, तर पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या पाल्यांना १० हजार रुपये पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
*अजय पवार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा उप जिल्हाधिकारी:* पुणे जिल्ह्यात ३३ हजार ३४८ माजी सैनिक व ७ हजार ३५६ वीर पत्नी असून माहे एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ अखेर ९४ लाख २२ हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. माजी सैनिकांच्या कल्याणार्थ शासनातर्फे अनेक योजना राबिवण्यात येतात. सेवा निवृत्तीनंतर माजी सैनिकांनी कार्यालयात नोंदणी करुन विविध योजनांचा लाभ घ्यावा.
(समाप्त)
संकलन: रोहिदास गावडे, उप माहिती कार्यालय, बारामती