बारामती ! एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांचे प्रक्षेत्र प्रशिक्षण
बारामती : बारामती उपविभागातील बारामती, इंदापूर, दौंड व पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत प्रक्षेत्र प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येत असून इच्छुकांनी २९ डिसेंबरपर्यंत नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, कृषी महोत्सव सिल्लोड, जि.औरंगाबाद (संभाजीनगर), नाशिक जिल्ह्यातील कळवण उपविभाग, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव, राष्ट्रीय कांदा-लसुन संशोधन केंद्र राजगुरुनगर व व्ही.एस.आय. मांजरी पुणे याठिकाणी हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
प्रशिक्षणामध्ये फळबाग, भाजीपाला, फुलशेती, तंत्रज्ञान तसेच फळबाग व्यवस्थापन, काटेकोर शेती व्यवस्थापन, कांदाचाळ, संरक्षण शेती, एकात्मिक कीड रोग, अन्नद्रव्य व्यवस्थापन, काढणी पश्चात व्यवस्थापन, प्राथमिक प्रक्रिया केंद्र निर्यातक्षम उत्पादन करता मार्गदर्शन, कृषी पर्यटन या विषयावर प्रगतशील शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर भेटीसोबत विविध संशोधन संस्थाच्या भेटीचे देखील नियोजन करण्यात येणार आहे.
उपविभागातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदविण्याकरीता संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे २९ डिसेंबरपर्यंत अर्ज करुन नोंदणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.