बारामती ! ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पाडावी - तहसिलदार विजय पाटील
बारामती : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सन २०२२ च्या कार्यक्रमांतर्गत बारामती तालुक्यात १८ डिसेंबर रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत १३ ग्रामपंचायतीत एकूण ६६ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पाडावी, असे आवाहन प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार विजय पाटील यांनी केले आहे.
तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी ३६ तर १२७ सदस्य पदासाठी २९१ उमेदवार रिंगणात आहेत. वाणेवाडी ग्रामपचायतीत ४, सोरटेवाडीतील ३, सोनकसवाडी, मोरगाव व गडदरवाडी येथील प्रत्येकी १ असे एकूण १० सदस्य पदाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
मोरगाव, वागळवाडी, पणदरे, मुरुम, वाणेवाडी,
गडदरवाडी, सोरटेवाडी, कुरणेवाडी, सोनकसवाडी, काऱ्हाटी, लोणी भापकर, मासाळवाडी व पळसी या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि सदस्य पदांसाठी मतदान होणार आहे.
निवडणूक प्रक्रीया यशस्विपणे राबवण्यासाठी ४६२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान प्रक्रीया पार पाडल्यानंतर सर्व सीलबंद मतपेट्या तहसिल कार्यालयातील हॉलमध्ये पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहेत. प्रशासकीय भवनातील बैठक सभागृहात २० डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १०.०० वा. पासून मतमोजणीस सुरुवात होईल, अशी माहिती तहसिलदार विजय पाटील यांनी दिली आहे.
आचार संहितेचे पालन करण्यात यावे. उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचे मतदारांना प्रलोभन दाखवू नये. मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळित पार पाडण्यासाठी प्रत्येक केंद्रावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्यात यावे, असे आवाहनही श्री.पाटील यांनी केले आहे.