२०१ बारामती विधानसभा मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू
मतदार नोंदणी, नोंदींची पडताळणी करण्याची संधी
बारामती दि. ७ : भारत निवडणूक आयोगाने घोषित केल्याप्रमाणे १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू झाला आहे, अशी माहिती बारामती विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली आहे.
या कार्यक्रमांतर्गत एकत्रीकृत प्रारुप मतदार याद्या ९ नोव्हेंबर २२ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. शनिवार १९ नोव्हेंबर, रविवार २० नोव्हेंबर, शनिवार ३ डिसेंबर आणि रविवार ४ डिसेंबर २०२२ या दिवशी सर्व मतदान केंद्रावर मतदार नोंदणीसाठीचे अर्ज, दावे व हरकती स्वीकारणे आदींसाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. तर २६ डिसेंबर २०२२ पर्यंत दावे व हरकती निकालात काढले जाणार आहेत. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी ५ जानेवारी २०२३ रोजी करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमादरम्यान नवीन मतदार नोंदणी, मयत, स्थलांतरित मतदार तसेच दुबार नावे वगळणे, नावात, पत्ता, इतर तपशीलात दुरूस्ती, मतदार नोंदीचे स्थानांतरण आदी अर्जांवर कार्यवाही करण्यात येणार आहे. मोहिमेदरम्यान आवश्यक नमुना अर्ज भरुन आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडे (बूथ लेव्हल ऑफीसर- बीएलओ) द्यावेत. तसेच या सर्व सुविधा ऑनलाईनरित्या https://www.nvsp.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत.
मतदार याद्या अधिक अचूक आणि दोषरहीत करण्याच्यादृष्टीने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही २०१ बारामती मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी श्री. कांबळे यांनी केले आहे.