तरडोलीत बंद घरात प्रवेश करत लाखोंचा ऐवज चोरी ; चोर सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील तरडोली येथे सातत्याने घरफोडीच्या घडना घडत आहेत. रविवार दि १३ रोजी मध्यरात्री वसंत दगडू कदम यांचा राहत्या घरी अज्ञात इसमांनी चोरी करुन तीन तोळ्याचा सुमारे दिड लाख रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज लंपास केला आहे. तसेच सदर अज्ञात चोर हे सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाले आहेत.
बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात बंद घरांची रेकी करुन चोरी करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या असून वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत हे प्रमाण वाढत चालले आहे. तरडोली येथे गेल्या दिड वर्षात अज्ञात चोरट्यांनी सहापेक्षा अधीक घरफोडी केली असल्याच्या घटना घडल्या आहेत. येथील वसंत दगडू कदम यांच्या राहत्या घरातील सोन्याचे दागिन्याची चोरी नुकतीच झाली आहे. रविवारी दि. १३ रोजी कदम यांच्या राहत्या घरी कोणीही नसल्याची खात्री करून अज्ञात इसमांनी त्यांच्या बंद गेटचे कोयंडा तोडला. तसेच घराचे व बेडरुमचे कुलुप मोटारसायकलवरुन आलेल्या तीन इसमांनी तोडून बेडरुमच्या कपाटातील सोन्याची दहा ग्रॅम वजनाची अंगठी तसेच २० ग्रॅम वजनाची डिझाईनयुक्त साखळी , बदाम असा एकूण तीन तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहे. याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये वसंत दगडू कदम यांनी फिर्याद केली आहे . अज्ञात चोरटे सीसी कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
मोरगाव बारामती या मुख्य रस्त्यावर असणाऱ्या घरातून ऐवज चोरी गेला असल्याने गावात अज्ञात चोरट्यांद्वारे होत असलेल्या चोरीमुळे दहशतीचे वातावरण पसरले आहे .