Type Here to Get Search Results !

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी ‘संकल्प संपूर्ण स्वास्थ्य’ कार्यक्रमइंडियन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स यांच्यासमवेत राज्य शासनाचा करार

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी ‘संकल्प संपूर्ण स्वास्थ्य’ कार्यक्रम

इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स यांच्यासमवेत राज्य शासनाचा करार
मुंबई  : राज्य शासनाच्या विद्यार्थी समग्र विकास धोरणांतर्गत राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी ‘संकल्प संपूर्ण स्वास्थ्य’ कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स (आयएपी) सोबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सामंजस्य करार केला आहे. शासकीय शाळांमधून बालकांच्या आरोग्याबाबत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचा करारात समावेश आहे.  

          शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत रामटेक या शासकीय निवासस्थानी हा करार करण्यात आला. शासनाच्यावतीने शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल आणि आयएपी संस्थेचे अध्यक्ष डॉ. उपेंद्र किंजवडेकर यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. याप्रसंगी शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव इम्तियाज काझी, डॉ. समीर दलवाई, डॉ. हेमंत गंगोलिया, डॉ. हेमंत जोशी आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे ध्येय- दीपक केसरकर

          ''शालेय शिक्षण विभागाअंतर्गत धोरण राबवताना विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासाला शासनाचे प्राधान्य आहे. यासाठी खेळ, आरोग्य या बाबी देखील महत्त्वाच्या असल्याने इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्ससोबत विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठीचा हा करार करण्यात आला आहे. या माध्यमातून त्यांचे बौद्धिक आणि शारीरिक आरोग्य राखले जाईल आणि त्याचा शैक्षणिक विकासावर सकारात्मक परिणाम होईल'', असा विश्वास मंत्री श्री.केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला.

संकल्प - संपूर्ण स्वास्थ्य

          या करारानुसार तीन ते नऊ आणि दहा ते अठरा या दोन वयोगटांमधील मुलामुलींची, शिक्षकांची आणि पालकांची कार्यशाळा, थेट संवाद आदी उपक्रम हाती घेतले जातील. हे उपक्रम आयोजित करण्याची जबाबदारी संपूर्णतः आयएपीची राहणार असून राज्य शासन यासाठी संपूर्ण सहकार्य करणार आहे. विद्यार्थ्यांचा समग्र विकास घडवून आणणे, या शासनाच्या धोरणास अनुसरून हा उपक्रम राबविला जाणार आहे. या करारांतर्गत शालेय शिक्षण विभागामार्फत दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये प्रगती व्हावी यासाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचप्रमाणे आयएपी ही संस्था बालकांचे शारीरिक, मानसिक व सामाजिक स्वास्थ्य उत्तम राहावे यासाठी विविध उपक्रम राबविते. याचाच एक भाग म्हणून या संस्थेने देशभर ‘संकल्प संपूर्ण स्वास्थ्य’ हा विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी पालक, शिक्षक आणि बालकांना शाळांमधून आरोग्यविषयक प्रशिक्षण देणारा कार्यक्रम सुरू करण्याचे योजिले आहे.

       याअंतर्गत योग्य व संतुलित पोषण, बाजारात अत्यंत मुबलकपणे उपलब्ध असणाऱ्या अन्न पदार्थांवरील वेष्टन वाचून योग्य/अयोग्य ओळखणे, मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य, टीव्ही, मोबाईल यांचा मर्यादित वापर, शारीरिक व्यायाम, पुरेशी निद्रा, पर्यावरणाबाबत सजगता,  व्यसनांपासून दूर राहण्याचे प्रभावी उपाय आदी उपयुक्त बाबींचे वयोपरत्वे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. एकदा प्रशिक्षित झाल्यावर शिक्षकही हा उपक्रम सहजपणे आपापल्या शाळेत पुढे चालू ठेवू शकतील, अशाप्रकारे या कार्यक्रमाची रचना करण्यात येणार आहे.

          या कार्यक्रमामध्ये आवश्यकतेनुसार वेळोवेळी सुधारणा केली जाईल, अशी माहितीही कराराच्यावेळी देण्यात आली.

                                                           

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test