जिल्हा ग्रंथोत्सवात श्रोते रंगले काव्यात
पुणे -उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवशी दुपारच्या सत्रात विसुभाऊ बापट यांच्या 'कुटुंब रंगले काव्यात' या एकपात्री नाट्यानुभवाने रंगत भरली. कार्यक्रमाला श्रोत्यांची भरभरून दाद मिळाली.
दुपारच्या सत्रात 'सार्वजनिक ग्रंथालयांची अर्जित अवस्था' याविषयी डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी जिल्ह्यातील लहान मोठ्या सर्व ग्रंथालयांच्या ग्रंथपाल आणि ग्रंथालय कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. ग्रंथालय चालवताना वाचन संस्कृती वाढीस लागावी यासाठी सेवाभावाने ग्रंथालय जपण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले. वाचकांना ग्रंथालयाकडे वळवण्यासाठी नवनवीन योजना अंमलात आणल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले.
गौरी लागू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जी.ए. यांच्या कथांचे अभिवाचन केले आणि जी.एंच्या लिखाणाचा समग्र परिचय करून दिला.
विसुभाऊ बापट यांनी एकपात्री सादरीकरणात मराठी कवितेचे वैभव श्रोत्यांसमोर मांडले. मराठी कवितेतील गझल, पाळणा, अभंग, गण, गवळण, ओवी, देशभक्तीपर गीत असे विविध प्रकार सादर करताना त्यांनी श्रोत्यांचे मनोरंजनही केले. भाऊसाहेब पाटणकर यांच्या 'सांगेन काही भव्य ऐसी शायरी माझी नव्हे...' या ओळींनी त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली आणि 'बलसागर भारत होवो' या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी माहिती उपसंचालक डॉ.राजू पाटोदकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले आदी उपस्थित होते.