जेजुरीतील वादग्रस्त जमिनीला कागदी घोड्यांचा आधार ...?
पेशव्यांच्या विरोधात देशमुखांचा वाद चव्हाट्यावर ;प्लॉट धारक संभ्रमात
पुरंदर प्रतिनिधी : सिकंदर नदाफ
पुरंदर तालुक्यात प्रस्तावित विमानतळाच्या मुद्द्यावरून ठिकठिकाणच्या जमिनीचे भाव अक्षरशः गगनाला भिडले असताना जेजुरी येथील वादग्रस्त जमिनी बाबत पेशव्यांच्या विरोधातला देशमुखांचा वाद आता चव्हाट्यावर येऊ लागला आहे.
देवमळा महसूल गाव असलेल्या तीर्थक्षेत्र जेजुरी येथे गट क्रमांक ८४४ हि मिळकत सखाराम बळवंत पेशवे यांची वडिलोपार्जित व मालकी हक्कासह ताबे वहिवाटीची असताना त्यांच्या मृत्यू पश्चात वारस नोंद होताना मात्र एकत्र कुटुंब मॅनेजर म्हणून म्हाळसाकांत सखाराम पेशवे यांचे नाव दाखल झाले होते.
परंतु सखाराम पेशवे यांनी त्यांच्या हयातीतच त्यांच्या नावे दाखल असलेल्या मिळकतींचे आप आपसात तोंडी वाटप करून वाटपाचे स्मरणार्थ टिपण म्हणून लेखी स्वरुपात लिहून ठेवले असताना म्हाळसाकांत पेशवे यांनी मात्र शासन दरबारी केवळ कागदी घोडे नाचवून सर्व मिळकती स्वत;बळकावल्या असल्याच्या आरोपावरून पद्मा मोरेश्वर देशमुख व श्रद्धा अनिल कुलकर्णी ( दोघींचे मूळ गाव वाल्हे ता.पुरंदर ) यांनी गेल्या काही वर्षापूर्वी हक्कसोडपत्र रद्द करून मिळण्यासह वाटपात हिस्सा मिळण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केला होता.
मात्र असे असूनही गेल्या काही महिन्यात पेशव्यांनी पुन्हा शासनाची दिशाभूल करून गट क्रमांक ८४४ या मिळकत क्षेत्रासाठी बेकायदेशीरपणे अकृषिक परवानगी मिळवली असल्याचा गौप्यस्फोट श्रद्धा कुलकर्णी यांनी लेखी निवेदनाव्दारे केला आहे.
अशातच वादग्रस्त क्षेत्रातून उच्चदाबाची वीज वाहिनी जात असूनही येथील मंडल अधिकाऱ्याने पैशाच्या लालसेपोटी चुकीच्या पद्धतीने पंचनामा करून पेशव्यांना अकृषिक परवानगी मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले असल्याचा गंभीर आरोप देखील पद्मा देशमुखांसह श्रद्धा कुलकर्णी यांनी निवेदनातून केला आहे.
परंतु सद्य स्थितीत या ठिकाणी प्लॉटींग होऊन त्याची डेव्हलपर्स वर्गाकडून गुंठेवारी प्रमाणे खरेदी विक्री देखील चढ्या दरात सुरु झाल्याने पेशवे विरोधातील देशमुखांचा वाद आता चव्हाट्यावर आला आहे.
यावेळी पद्मा देशमुख व श्रद्धा कुलकर्णी यांनी गट क्रमांक ८४४/१ ते ८४४/२ या क्षेत्राची अकृषिक परवानगी रद्द करण्याच्या प्रलंबित मागणीसाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे .तर डेव्हलपर्स वर्गाच्या विरोधातही कायदेशीर दावा दाखल करणार असल्याचा पवित्रा त्यांनी घेतल्याने येथील प्लॉट धारकात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे चित्र स्पष्ट आहे.