Type Here to Get Search Results !

चांदणी चौकातील उड्डाणपूलाच्या कामाला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट

चांदणी चौकातील उड्डाणपूलाच्या कामाला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट
काम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश

पुणे : चांदणी चौकातील एकात्मिक उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामाला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भेट देऊन पाहणी केली. या प्रकल्पाचे काम गतीने  पूर्ण करण्यात यावे असे निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी बुधवारी या प्रकल्पाची पाहणी केली व प्रकल्प पूर्ण करण्याच्यादृष्टीने उर्वरीत कामाच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम उपस्थित होते.

 सद्यस्थितीत प्रकल्पाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे.  जून २०२३ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. जुना पूल पाडल्यामुळे सध्या सेवा रस्त्यासाठी व इतर कामासाठी दोन्ही बाजूचे खडकाचे खोदकाम प्रगतीत आहे. सद्यस्थितीत पुलाच्या ठिकाणी मुंबई-सातारा दिशेला पाच लेन व सातारा-मुंबई साठी तीन लेन अशा एकूण आठ लेन वाहतुकीसाठी उपलब्ध केल्या आहेत. तसेच साताऱ्याकडून एनडीए मार्गे मुंबईला जाण्यासाठी अतिरिक्त २ लेन उपलब्ध आहेत.

बेंगळुरू मुंबई हायवेवरील सद्यस्थितीतील चौपदरी रस्त्याचे सहापदरीकरण करण्यासाठीचे आधार भिंतीचे (रिटेनिंग वॉल) व माती भरावाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरीत काम १५ दिवसात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. श्रृंगेरी मठाच्या बाजूने सातारा वारजे कडे जाणाऱ्या ४ पदरी सेवा रस्त्याचे काम पूर्ण झाले असून वाहतूकीस खुला करण्यात आलेला आहे. बावधन कडून साताऱ्याकडे जाणाऱ्या रॅम्प क्र. ६ चे काम प्रगतीत असून दिड महिन्यात पूर्ण करण्यात येईल. 

कोथरुड- वारजे- सातारा हा सेवा रस्ता महामार्गाला जोडला असून वाहतूकीस खुला करण्यात आला आहे. उर्वरीत काम पुढील १५ दिवसात पूर्ण करण्यात येईल. एन डी ए ते मुंबई या रॅम्प क्र. ५ चे काम प्रगतीत असून पुढील १० दिवसात पूर्ण होईल. मुळशी ते कोथरुड या रस्त्यावरील जुन्या भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम प्रगतीत असून पुढील दीड महिन्यात काम पूर्ण होईल. मुळशी ते सातारा रॅम्प चे काम जवळ जवळ पूर्ण झाले असून त्यावरून मुळशी वरुन येणारी वाहतूक १३ सप्टेंबरपासून वळविण्यात आली आहे.

मुळशी मुंबई रॅम्पच्या उर्वरीत भूसंपादनाच्या कामाच्या अनुषंगाने न्यायप्रविष्ठ प्रकरणात २० ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने भूसंपादनाचे काम करण्यास परवानगी दिलेली आहे. पुणे महानगर पालिकेकडून जागेचा ताबा मिळाल्यानंतर १ नोव्हेंबर २०२२ रोजी पासून प्रत्यक्ष कामास सुरवात करण्यात आलेली आहे. उर्वरीत काम पुढील एक महिन्यात पूर्ण होईल. त्यामुळे मुळशी कडून मुंबई कडे जाणारी वाहतूक सुरळीत होईल, अशी माहिती यावेळी श्री. कदम यांनी दिली.

*एनडीए सर्कल सुशोभीकरणास लवकरच प्रारंभ*
कोथरुड- एनडीए रोड- मुळशी व एनडीए - मुंबई च्या दरम्यान असणाऱ्या ‘एनडीए सर्कल’ चे सुशोभीकरण करण्याविषयी जिल्हाधिकारी यांनी एनडीए, पुणे महानगर पालिका व एनएचएआय यांची संयुक्त बैठक घेवून चौकाचे सुशोभीकरण करणेविषयी सूचना केलेल्या होत्या. त्यानुसार दिशा कन्सल्टंट यांचेकडून बनवण्यात आलेल्या आराखड्यास (मॉडेल) एनडीए कडून नुकतीच सहमती मिळालेली आहे. हे सुशोभीकरणाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे, असेही श्री. कदम यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test