बारामती ! कृषि उन्नती योजनेचा लाभ घेण्याचे कृषि विभागाचे आवाहन
बारामती दि. ११ : कृषि उन्नती योजना २०२२-२३ अंतर्गत ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार असून कृषि विभाग व महाबीजमार्फत शेतकऱ्यांना कडधान्य, गळीतधान्य व तृण धान्याचे प्रमाणित बियाणे अनुदानाच्या दराने पुरवठा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप विभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे केले आहे.
या ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमात शेतकऱ्यांना बियाणे परमिटवर वाटप करण्यात येणार आहे. एक एकर मर्यादित कडधान्य व गळीत धान्य बियाण्यासाठी ६० टक्के व तृण धान्य बियाण्यासाठी ५० टक्के अनुदान देय असणार आहे.
बारामती, दौंड, इंदापूर व पुरंदर तालुक्यात हरभरा बियाण्याच्या १० वर्षांच्या आतील वाणास प्रत्येकी ३५ क्विंटल, १० वर्षावरील वाणास प्रत्येकी ५५ क्विंटल, गहू बियाण्याच्या १० वर्षांच्या आतील वाणास बारामती व इंदापूर तालुक्यासाठी प्रत्येकी १३ क्विंटल, दौंड व पुरंदरसाठी प्रत्येकी १४ क्विंटल व १० वर्षावरील वाणास बारामतीसाठी ८६, दौंडसाठी ९५, इंदापूर व पुरंदरसाठी प्रत्येकी ८० क्विंटल बियाणे वाटपाचे लक्षांक ठरवण्यात आले आहे.
महाबीज कंपनीचे अधिकृत बियाणे विक्रेते पुढीलप्रमाणे. *बारामती तालुका* - महालक्ष्मी ॲग्रो एजन्सी, तालुका खरेदी विक्री संघ बारामती सर्व शाखा, *इंदापूर तालुका* -कृषि संपदा एजन्सी इंदापूर, गणेश कृषि सेवा केंद्र, इंदापूर, महाराष्ट्र ॲग्रो एजन्सी, भिगवण, श्रीराम कृषि सेवा केंद्र, भवानीनगर, *दौंड तालुका*- नितीन ॲग्रो एजन्सी, केडगाव, तालुका खरेदी विक्री संघ, केडगाव, शिवशक्ती कृषि सेवा केंद्र, राहू, अतुल कृषि सेवा केंद्र, पारगाव, *पुरंदर तालुका* विकास ॲग्रो एजन्सी, सासवड, शेती उद्योग भंडार, सासवड, तालुका खरेदी विक्री संघ सासवड व पी. एम. व्होरा ॲग्रो एजन्सी, निरा.
महाबीज संस्थेने जाहिर केलेले हरभरा व गहू पिकांच्या बियाण्याच्या प्रति एकर अनुदानित दराची माहिती कृषि विभाग व महाबीज कंपनीची एजन्सी यांच्याकडे उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी ७/१२ उतारा व आधार कार्ड घेवून संबंधित गावचे कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधून बियाण्याचे परमिट घ्यावे व महाबीजच्या अधिकृत विक्रेत्यांकडून अनुदानित बियाणे खरेदी करावे, असे प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.