Type Here to Get Search Results !

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला आयएसओ मानांकन प्रदान सोहळा

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला आयएसओ मानांकन प्रदान सोहळा
नवीन शिक्षण धोरणात लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षणाच्या भूमिकेवर भर- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

पुणे : केंद्र सरकारतर्फे आत्मनिर्भर भारताची संकल्पना राबविली जात आहे. मात्र या संकल्पनेचे प्रेरणास्थान लोकमान्य टिळक आहेत. नवीन शिक्षण धोरणातही लोकमान्यांच्या राष्ट्रीय शिक्षणाच्या भूमिकेवर भर देण्यात आला आहे. रोजगार, नोकरी आणि समाजाच्या गरजेनुसार शिक्षणाचा त्यात समावेश करण्यात आला आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.

 टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला 'आएसओ 21001:2018'  मानांकन प्रदान सोहळा आणि  विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक यांनी लिहिलेल्या‘जाणिवा कर्मयोगाच्या' या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात  ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक, प्र. कुलगुरू डॉ. गीताली टिळक, टिमवी ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक, विश्वस्त डॉ. प्रणती  टिळक, प्र-कुलसचिव अभिजीत जोशी, सचिव अजित खाडीलकर, 'आयएसओ'चे पुणे विभागाचे प्रमुख अनिल कदम आदी उपस्थित होते.

लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षणाचा वारसा चालविण्याचे कार्य टिळक महाराष्ट्र विद्यापीठ अविरत करत आहे अशा शब्दात विद्यापीठाचा गौरव करून मंत्री श्री.विखे-पाटील म्हणाले, आयएसओ मानांकन मिळवणारे देशातील पहिले विद्यापीठ ठरल्यामुळे हे विद्यापीठ शैक्षणिक संस्थांसमोर आदर्श ठरले आहे. हा केवळ टिमविचा गौरव नसून राज्याच्या शिक्षण व्यवस्थेचा गौरव आहे. या गौरवामुळे शिक्षण क्षेत्राला नवी ऊर्जा मिळेल. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांच्या गरजेनुसार शिक्षण देण्यात हे विद्यापीठ आग्रेसर आहे. काळाची पावले ओळखून अभ्यासक्रम व शिक्षण पद्धतीत बदल केल्यामुळे या विद्यापीठाची स्वतंत्र अशी ओळख निर्माण झाली आहे. 

श्री. विखे पाटील यांनी पुढे सांगितले, परदेशातील नामांकित विद्यापीठाचे कॅम्पस आपल्याकडे येत आहेत. शिक्षणाच्या क्षेत्रात जगाच्या तुलनेत आपले स्थान समजण्यास त्यामुळे मदत होणार आहे. लोकमान्य टिळक हे देशाचे स्फूर्तिस्थान आहेत. त्यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या विद्यापीठाला जयंतराव टिळक यांचा वारसा लाभला असल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले. तोच वारसा डॉ. दीपक टिळक पुढे चालवत आहेत, असेही ते म्हणाले.

डॉ. दीपक टिळक म्हणाले, ‘जाणिवा कर्मयोगाच्या' या पुस्तकात विविध विषयांवरील लेख आहेत. मात्र या लेखात लोकमान्यांच्या कर्मयोगाच्या विचाराचा धागा आहे. तसेच त्यास गीतारहस्याची बैठक आहे. मात्र आता समाज बदलला आहे. संकल्पनाही बदलल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा तरूणाईला सोप्या भाषेत लोकमान्यांचे विचार सांगण्याची गरज आहे. त्यामुळे सोप्या भाषेत लोकमान्यांचे विचार पुस्तकातून मांडले आहेत.

डॉ. गीताली टिळक म्हणाल्या, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ हे 'आयएसओ' मानांकन मिळविणारे  देशातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षण व रोजगाराभिमुख शिक्षण पद्धती विद्यापीठाने राबविली. विद्यापीठातील गुणवत्तापूर्ण व दर्जात्मक शिक्षणामुळे विद्यापीठाचा सन्मान झाला आहे. विद्यापीठातील विविध विभागांनी कायमच शैक्षणिक दर्जाची उंची टिकवून ठेवली. हे आयएसओ नामांकन मिळण्यात विद्यापीठाच्या सर्व घटकांचा महत्वाचा सहभाग आहे.

आयएसओचे अधिकारी महेश मालपाठक यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला 'आएसओ 21001:2018' हे मानांकन प्रदान केले. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test