सोमेश्वरनगर ! कोंढाळकरवस्ती येथे लोकसहभागातून उभारला वनराई बंधारा
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील मगरवाडी (कोंढाळकर वस्ती) येथे लोकसहभागातून कृषी विभागामार्फत वनराई बंधाऱ्याचे काम करण्यात आले . या बंधाऱ्याचा लाभ आजुबाजूच्या लोकांना होणार असून, शेतकरी बांधव समाधानी झाले आहेत. बंधाऱ्याच्या कामासाठी कृषी पर्यवेक्षक प्रवीण माने व कृषी सहाय्यक शरद सावंत यांनी मार्गदर्शन केले.
उपविभागीय कृषी अधिकारी बारामती वैभव तांबे व तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून स्वयंभू व शेतकरी राजा शेतकरी गटाने ही कामगिरी पूर्ण केली. यावेळी मगरवाडी सरपंच अजित सोरटे, ग्रामपंचायत सदस्य नम्रता कोंढाळकर,सचिन साळुंके,शहाजी कोंढाळकर ,नितीन येळे व शेतकरी गटातील इतर शेतकरी यांच्या सहकार्यातून वनराई बंधाऱ्याचे काम पूर्ण केले. या कामामुळे वाहून जाणारे पाणी त्या ठिकाणी मुरल्यामुळे परिसरातील बोरवेल विहिरींना पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होऊन शेतकऱ्यांला याचा लाभ होणार आहे. दरम्यान, अशाप्रकारचे बंधारे उभे करणे हे खूप गरजेचे आहे. त्यामुळे पाणीपातळी वाढवण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येक गावात अशाप्रकारचे बंधारे होणे ही काळाची गरज आहे अशी भावना गटातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
“राज्यात यंदा पाऊस लांबला. त्यामुळे खरिपाचे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्ती रोखण्याचे साधन कृषी विभागाच्या हातात नाही. मात्र, याच पाण्याचा वापर रब्बी हंगामासाठी कसा करता येईल, याबाबत उपाय करता येतात. त्यामुळेच ‘आम्ही वनराई बंधारे उभारणी’ उपक्रम हाती घेतला. रब्बीमध्ये यंदा गहू व हरभरा या दोन मुख्य पिकांचे क्षेत्र वाढणार आहे. वनराई बंधारे झालेल्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना या दोन्ही पिकांसाठी अतिरिक्त पाणी साठ्याचा उपयोग होईल,” अशी माहिती मंडळ कृषी अधिकारी वडगाव निंबाळकरचे हिंदुराव मोरे यांनी दिली.