कऱ्हावागज येथे लोकसहभागातून उभारला वनराई बंधारा
बारामती दि. १३: बारामती तालुक्यात कृषी विभागामार्फत लोकसहभागातून वनराई बंधारे उभे करण्याची मोहीम तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांचे मार्गदर्शनखाली सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत कऱ्हावागज येथील वनराई बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे.
ओढ्यातून वाहत जाणारे शेवटच्या टप्यातील पाणी अडवून कऱ्हावागज येथे वनराई बंधारा बांधण्यात आला आहे. या पाण्याचा उपयोग रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू इत्यादी पिकांना जीवनदान देण्यासाठी होणार असून साधारण १० ते १५ हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे.
कऱ्हावागज गावातील प्रगतशील शेतकरी चंद्रकांत गावडे, प्रशांत बनकर, अनिल नवले, योगेश नाळे व निवृती गावडे यांच्या व इतर शेतकऱ्यांच्या श्रमदानातून हा वनराई बंधारा उभारण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन मंडळ कृषी अधिकारी अरविंद यमगर व कृषी पर्यवेक्षक किसन काझडे यांनी केले. क-हावागज परिसरामध्ये जास्तीतजास्त वनराई बंधारे उभारणी करण्याचे आवाहन कृषी सहाय्यक संतोष पिसे यांनी शेतकरी बांधवांना केले आहे.