बारामती ! राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत कृषि विभागाकडून रब्बी हंगामातील पिकांच्या प्रात्यक्षिकांचे नियोजन
बारामती दि.१० : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत बारामती उपविभागात कृषि विभागाकडून १६ हजार २२५ एकर क्षेत्रावर रब्बी हंगामातील विविध पिकांच्या प्रात्यक्षिकांचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उप विभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे यांनी दिली आहे.
रब्बी हंगामातील पिक प्रात्यक्षिके २५ एकर क्षेत्राच्या समुह प्रात्यक्षिक धर्तीवर राबविण्यात येतात. पिक प्रात्यक्षिकांतर्गत निवडलेल्या समुहातील शेतक-यांच्या क्षेत्रावर यांत्रिक, बीबीएफ व टोकन पद्धतींचा अवलंब करण्यात येतो. प्रात्यक्षिक पिकाची तालुक्याची उत्पादकता, त्या पिकाचे उच्चतम उत्पादन घेतलेल्या शेतक-यांची उत्पादकता आणि त्या पिकाची विद्यापीठाने ठरवून दिलेली उत्पादन क्षमता यात मोठी तफावत असल्याने पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी स्थानिक कृषि हवामान पध्दतीचा विचार करून कृषि विद्यापीठाने शिफारस केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून पिक प्रात्यक्षिकांचे आयोजन केले जाते.
बारामती कृषि उपविभागात रब्बी हंगाम २०२२-२३ मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत रब्बी ज्वारी १५ हजार ३२५ एकर, हरभरा ४७५ एकर व ऊस ४२५ एकर अशा एकूण १६ हजार २२५ एकर क्षेत्रावर प्रात्यक्षिकांचे नियोजन केले आहे. पिक प्रात्यक्षिकांसाठी १० वर्षाच्या आतील पिकांच्या वाणांचे बियाणे, जैविक खते, सुक्ष्म मुलद्रव्ये व जैविक किटकनाशक इत्यादींचा १६ हजार २२५ शेतक-यांना अनुदानावर पुरवठा करण्यात आलेला आहे.
शेतकऱ्यांच्या शेतीशाळा, शेतकरी प्रशिक्षण, कृषि शास्त्रज्ञ भेटी व क्षेत्रिय भेटी यांचे आयोजन करून शेतक-यांना मार्गदर्शन करण्यात येत असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तांबे यांनी केले आहे.