Type Here to Get Search Results !

जल जीवन मिशन अंतर्गतची कामे वेळेत पूर्ण करा -जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

जल जीवन मिशन अंतर्गतची कामे वेळेत पूर्ण करा -जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
पुणे,  ग्रामीण भागात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी व तेथील जीवनमान उंचावण्यासाठी जल जीवन मिशन राबविण्यात येत असून या मोहिमेअंतर्गत करण्यात येणारी कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीच्या बैठकीच्या वेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संचालक शालिनी कडू, ग्रामीण पाणी पुरवठा बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ  उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, प्रत्येक गावामध्ये पेयजलाचा नियमित पुरवठा होण्यासाठी आराखड्यात नमूद केलेल्या उपाययोजनेची विहित वेळेत अंमलबजावणी करावी. जल जीवन मिशन (हर घर जल) अंतर्गत सुरु असलेली प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत. कामाच्या प्रगतीबाबत आठवडानिहाय बैठकीचे आयोजन करावे. प्रलंबित शासकीय जागांबाबतचे प्रस्ताव जिल्हा परिषदेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजूरीसाठी पाठवावे. कामे पूर्ण करताना पाणी व कामाच्या गुणवत्तेला प्राधान्य द्यावे. पिण्याच्या पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी करुन घ्यावी. 

हवेली तालुक्यातील आव्हाळवाडी येथे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने योजना पूर्ण करुन हे गाव जल जीवन मिशनच्या आराखड्यातून वगळण्यात यावे. जिल्ह्यात पाणी पुरवठा योजनेसाठी प्रलंबित १३७ गावातील जागेबाबत गावपातळीवर बैठक आयोजित करुन प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिल्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रसाद म्हणाले, जल जीवन मोहिमेअंतर्गत सुरु असलेल्या कामाबाबत गावाच्या दर्शनी भागात माहितीचा फलक लावावा. शाळा, अंगणवाडी आणि आरोग्य उपकेंद्रे याठिकाणी नळजोडणीची कामे मोहिमस्तरावर पूर्ण करावे. कामांना गती देण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात बाह्ययंत्रणेमार्फत मनुष्यबळाचा वापर करावा. ज्या ग्रामपंचायतीनी बँकेत खाते काढले नाहीत त्यांनी तात्काळ बँकेत खाते काढून घ्यावेत. 

कामांचे उर्वरित कार्यादेश कोणत्याही परिस्थितीत ऑक्टोबर अखेरपर्यंत निर्गमित करावेत. सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या कामाच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र आणि पुणे जिल्हा परिषद यांच्यामध्ये सामंजस्य कराराप्रमाणे कंत्राटदारांना मुद्रा कर्ज उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करावी. कंत्राटदारांनी जिल्हा परिषदेच्या ॲपवर कामाची छायाचित्रे अपलोड करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले. 

कार्यकारी अभियंता श्री. खताळ यांनी जल जीवन मिशन- हर घर जल अंतर्गत सुरु असलेल्या कामाबाबत माहिती दिली. जिल्ह्यात 'हर घर जल' अंतर्गत एकूण ३८ गावे घोषित करण्यात आलेली आहेत. प्रलंबित कामे अधिक वेगाने पूर्ण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test