बारामती ! नवरात्रोत्सवानिमित्ताने सामाजिक महाभोंडला उत्साहात पार पडला.
बारामती - महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूल, बारामती येथे सोमवार,दि.०३ रोजी नवरात्रोत्सवानिमित्ताने सामाजिक महाभोंडल्याचे आयोजन करण्यात आले होते
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली क्षीरसागर आणि पालक-शिक्षक संघाच्या सदस्यांच्या हस्ते देवीचे व प्रतिमारुपी हत्तीचे पूजन करण्यात आले. महाभोंडल्याची सुरुवात भोंडल्याच्या पारंपारिक गाण्यांनी करण्यात आली. शाळेतील पूर्व प्राथमिक विभाग, प्राथमिक विभाग तसेच माध्यमिक विभागातील सर्व विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होते. सामाजिक महाभोंडल्याच्या निमित्ताने वेशभूषा, उत्कृष्ट नृत्य, उत्कृष्ट नृत्य करणारी जोडी तसेच विद्यार्थी - पालक यांची उत्कृष्ट नृत्य जोडी या आणि अशा विविध सादरीकरणासाठी बक्षीसांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व विभागांचे विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी फेर धरून गरबा व दांडिया खेळण्याचा आनंद लुटला.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या कु.ऐश्वर्या शिंदे (जिम चालक, नृत्य दिग्दर्शक) देणगीदार तसेच शाळेचे हितचिंतक यांचे देखील या प्रसंगी सत्कार करण्यात आले.
सामाजिक महाभोंडल्याच्या निमित्ताने शाळेतील काही पालकांनी विविध उत्पादनांचे स्टॉल्स लावले होते. तसेच आपल्या शाळेतील माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पणत्या व आकाशकंदील यांचीही पालकांनी खरेदी करून विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला. यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यवहार ज्ञानात भर पडावी हा यामागचा उद्देश होता.
सामाजिक महाभोंडल्याला आमंत्रित माजी पालक,जुने शिक्षक व विद्यार्थी यांनीही उपस्थित लावली. सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना खिरापतीचे वाटप करण्यात आले.
अशा प्रकारे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली क्षीरसागर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेली कामे पार पाडली.