सोमेश्वरनगर ! लोणी भापकर येथील पुरातन मल्लिकार्जुन मंदिराचा भाग पावसाने ढासळला
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथील दशभुजा दत्त संस्थान अंतर्गत असणाऱ्या मल्लिकार्जुन (महादेव) मंदिराच्या उजव्या बाजूची भिंत व सभा मंडपाचे गोपूर सध्या परतीचा पाऊस अतिवृष्टी चालू असताना ढासळले. अतीसुंदर, रेखीव पुरातन कालीन या मंदिराची रचना सुमारे ९०० वर्षांपूर्वीची यादव कालीन आहे. ज्यावेळेस हा भाग कोसळला त्यावेळी मंदिरात भाविक कुटुंब सेवेस होते परंतु योगायोगाने मनुष्यहानी झाली नाही. सदर मंदिर हे राज्य संरक्षित समारक म्हणून दि.२९ ऑक्टोबर २०१६ रोजी (अधिसूचना प्रसिद्ध संदर्भ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग ४, पृष्ठ ४ ते ७ अन्वये) घोषित करण्यात आले आहे.
२०१६ पासून मंदिराच्या जीर्णोद्धाराबाबत तसेच पुरातन मंदिराचे जतन व्हावे यासाठी पुरातत्त्व विभाग यांच्याकडे पुणे, मुंबई कार्यालयाशी सतत पाठपुरावा चालू आहे. गेली सात वर्षे पाठपुरावा करूनही ठोस उपाययोजना झाली नाही, ऑक्टोबर २०२१ मध्ये मा. उपसंचालक पुरातत्व विभाग यांनी समक्ष पहाणी करून त्यावेळी धोक्याची सूचना दिली होती त्याप्रमाणे तात्पुरता सपोर्ट देण्याचे काम संस्थानने केले होते. मंदिर एका बाजूने खचल्याने भिंत पडेल किंवा जीवित हानी होऊ शकते असे पुरातत्व विभागाने कळविले होते. तदनंतर जिल्हाधिकारी नियोजन मंडळासही दुरुस्तीबाबत पत्रव्यवहार केला गेला होता.
या घटनेनंतर मात्र ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविक भक्त यांनी शासनाने दुरुस्तीची तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी होऊ लागली असल्याची माहिती श्री दशभूजा दत्त संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब गोलांडे यांनी दिली आहे.