Type Here to Get Search Results !

जीवन जगण्याचा आनंद देणारे शिक्षण गरजेचे-पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील.

जीवन जगण्याचा आनंद देणारे शिक्षण गरजेचे-पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील.

पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेअंतर्गत २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील आदर्श शिक्षकांना पुरस्कार वितरीत करण्यात आले. देशाच्या प्रगतीची मजबूत पायाभरणी करण्यासाठी शाळेतून जीवन जगण्याचा आनंद देणारे शिक्षण मिळणे गरजेचे आहे असे श्री.पाटील यावेळी म्हणाले.

बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमाला मनपा आयुक्त विक्रम कुमार, शिक्षणाधिकारी मीनाक्षी राऊत, पोपटराव काळे, शिक्षण समितीच्या माजी अध्यक्षा मंजुश्री खेडेकर उपस्थित होते.

पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करून पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, शाळांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शासन, महानगरपालिका, उद्योग आणि दानशूर व्यक्तींचे सहकार्य घेता येईल, मात्र त्या शाळेतून विद्यार्थ्यांना ज्ञान देताना त्यांना जीवनातील आनंद देणे  गरजेचे आहे. विद्यार्थी केवळ उत्तीर्ण होऊन चालणार नाही तर त्याचा पाया मजबूत व्हायला हवा. देशाच्या प्रगतीसाठी कुशल मनुष्यबळ, उत्तम शिक्षण आणि संशोधन आवश्यक आहे. त्याची पायाभरणी शालेय जीवनात व्हावी अशी अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत महापुरुषांची चरित्रे आणि आपल्या संस्कृतीविषयीची माहितीदेखील द्यावी, असे त्यांनी सांगितले.

 आजही प्राथमिक शाळेत शिकविणारे शिक्षक-शिक्षिका आठवतात असे सांगून  श्री.पाटील म्हणाले, वाढत्या लोकसंख्येच्या शहरात राज्य आणि देशातील विविध भागातून रोजगारासाठी नागरिक येतात. त्यापैकी कमी उत्पन्न असलेल्यांची संख्याही बऱ्यापैकी आहे. या नागरिकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी महानगरपालिकेच्या शाळा प्रमुख आधार आहे.  अशा शाळेतून सीबीएसई अभ्यासक्रम सुरू करता  येईल का याचा विचार करण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

 विद्यार्थी मोठे झाल्यावर ते शिक्षकांची आठवण काढतील असे कार्य शिक्षकांच्या हातून घडावे, अशा शुभेच्छा पालकमंत्र्यांनी दिल्या.

प्रास्ताविकात विक्रम कुमार म्हणाले, कोरोनामुळे दोन वर्षे  आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण झाले नाही. या संकट काळात शिक्षकांनी ऑनलाईन माध्यमातून अध्यापनाचे कार्य केले. महानगरपालिकेच्या एकूण ३०० शाळा असून १ लाख १० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची महानगरपालिकेची जबाबदारी आहे. सर्व शाळा डिजिटल केल्या असून अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.  यापुढे अधिक उत्तम शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले. आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी ५९ प्रस्ताव प्राप्त झाले होते त्यापैकी १५ शिक्षकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली.

श्रीमती खर्डेकर यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. महानगरपालिकेच्या शिक्षकांनी पालकत्वाच्या भूमिकेतून विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याचे काम केले असे त्यांनी सांगितले.

पुरस्कार विजेते शिक्षक अंकुश माने यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला महानगरपालिका शाळांमधील शिक्षक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test