पुरंदर ! कोळी समाजाच्या लढ्याला बळ देणार – टेकवडे
वाल्हे - संपूर्ण कोळी समाजाला अनुसूचित जाती जमातीतील आदिवासी कोळी समाजाचा दर्जा मिळावा यासाठी गेली कित्येक वर्षापासून महाराष्ट्र कोळी समाज संघाचा लढा सुरु आहे. परंतु यापुढे त्यांच्या या लढ्याला बळ देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याची ग्वाही बारामती लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अजिंक्य टेकवडे यांनी दिली.
वाल्हे ( ता.पुरंदर ) येथे महाराष्ट्र कोळी समाज संघाच्या वतीने महर्षी वाल्मिकी ऋषींच्या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या दरम्यान शेकडो भाविकांनी वाल्मिकी ऋषींच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी देखील केली होती .यावेळी आयोजित कार्यक्रमात कोळी बांधवांच्या अडचणी समजून घेताना टेकवडे हे बोलत होते.
ते पुढे म्हणाले कोळी बांधवांच्या जातप्रमाण पत्रातील अडचणी सोडवण्यासह वाल्मिकींच्या समाधीस्थळी भाविकांना नव्याने विविध सुख सोयी उपलब्ध करण्याहेतू संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे व जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे यांची देखील मदत घेणार आहे.
या प्रसंगी कोळी समाज संघाचे प्रदेश अध्यक्ष जयेश तरे उपाध्यक्ष अरविंद चिव्हे यांसह वाल्हे गावाचे सरपंच अमोल खवले उपसरपंच अंजली कुमठेकर भाजपचे सचिन लंबाते माजी सभापती गिरीश पवार युवा नेते सागर भुजबळ राहुल यादव हनुमंत पवार तसेच मदन भोई नवनाथ देशमुख पोलीस हवालदार संतोष मदने दत्तात्रेय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद कदम यांनी केले तर उपस्थितांचे आभार मल्हारी माने यांनी मानले.