चिपी विमानतळाला बॅ.नाथ पै विमानतळ असे नाव देणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै विमानतळ असे नाव देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
बॅ. नाथ पै यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे झाला. त्यांनी स्वातंत्र लढ्यामध्ये सहभाग घेतला व वेळोवेळी कारावास भोगला. गोवा मुक्ती संग्रामात देखील ते अग्रेसर होते. स्वातंत्र्योत्तर कालावधीत त्यांनी राजापूर लोकसभा मतदार संघातून प्रतिनिधीत्व केले.
कोकण रेल्वेच्या संकल्पनेमध्ये त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. बॅरिस्टर नाथ पै यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. हे औचित्य लक्षात घेवून चिपी परुळे येथील ग्रीनफिल्ड विमानतळाला बॅ. नाथ पै विमानतळ असे नाव देण्याचा निर्णय आज घेण्यात आला. हा प्रस्ताव विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांमधील सदस्यांच्या मान्यतेने केंद्र शासनाकडे पाठविण्यात येईल.