कोल्हापूर येथील श्री शाहू छत्रपती मिलचा भोंगा पुन्हा ऐकू येणार....
कोल्हापूर येथील श्री शाहू छत्रपती मिलचा भोंगा पुन्हा ऐकू येणार....राजर्षी छत्रपती शाहू स्मारकाच्या दिशेने पहिले पाऊल
-वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई,कोल्हापूर येथील श्री शाहू मिलच्या जागेवर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक उभारणीच्या कार्यातील पाहिले पाऊल म्हणता येईल असा निर्णय शासनाने घेतला असून, कोल्हापूर शहरवासीयांच्या जिव्हाळ्याचा असणारा शाहू मिलचा भोंगा पुन्हा एकदा कोल्हापूरांना ऐकू येणार असल्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
श्री शाहू मिलच्या जागेवर, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार व त्यांच्या महान कार्याचे दाखले हे एक आदर्श राजवट म्हणून पुढील पिढ्यांच्याही स्मरणात राहतील असे भव्य स्मारक उभारण्यात यावे ही समस्त कोल्हापूरकरांची इच्छा लवकरच मूर्त स्वरूप धारण करेल असेही श्री.पाटील म्हणाले.
.
रोजगार निर्मिती हा राजर्षी शाहू महाराजांच्या प्रगत व द्रष्ट्या विचारांचा आदर्श समोर ठेवून राजर्षी छत्रपती शाहु स्मृती व विचार जतन समितीने कोल्हापुरकरांच्या प्रतिष्ठेचा विषय असलेली ही मिल पुनर्जीवित करण्याचे देखील सुचवले असून त्यासाठी या समितीने केलेल्या शिफारशी शासनाच्या विचाराधीन आहेत. काही मार्गदर्शक सूचनांचे पालन व अटींची पूर्तता करून सर्व प्रथम या मिलचा भोंगा सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. यामध्ये भोंगा वाजविण्यासाठी शासन स्तरावर घ्याव्या लागणाऱ्या आवश्यक परवानग्यांच्या अधिन राहून प्रथम सहा महिन्यांसाठी महामंडळाची हरकत नाही. तसेच, मिलच्या आवारात भोंगा योग्य ठिकाणी बसवण्यासाठी आणि संपूर्ण तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाची जबाबदारी सदर समितीची राहील.
.
या सर्व नियमांचे कटाक्षाने पालन करून ही प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी. असेही वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.