Type Here to Get Search Results !

निधन वार्ता ! माणिकराव गावित यांच्या निधनाने अनुभवी व लोकाभिमुख नेतृत्व हरपलेसंसदेत तब्बल ९ वेळा निवडून गेलेले लोकप्रतिनिधी असा त्यांचा लौकिक होता

निधन वार्ता ! माणिकराव गावित यांच्या निधनाने अनुभवी व लोकाभिमुख नेतृत्व हरपले

संसदेत तब्बल ९ वेळा निवडून गेलेले लोकप्रतिनिधी असा त्यांचा लौकिक होता
मुंबई, दि. १७ सप्टेंबर
ज्येष्ठ, अनुभवी नेते व माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांचे निधन अत्यंत दुःखद असून संसदेत तब्बल ९ वेळा निवडून गेलेले लोकप्रतिनिधी असा त्यांचा लौकिक होता. गावित यांच्या निधनाने राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील प्रदिर्घ अनुभव असलेले लोकाभिमुख नेतृत्व हरपले आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.

माणिकराव गावित यांचा जन्म नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील धुलिपाडा गावात एका आदिवासी कुटुंबात झाला. गावित यांनी १९८१ पासून २००९ सालापर्यंत सलग नऊवेळा नंदूरबार लोकसभा मतदारसंघातून बहुमताने विजय संपादन केला. १५ व्या लोकसभेत माणिकराव गावित व मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वासुदेव आचार्य हे तब्बल नऊवेळा खासदारकी भूषवलेले सदस्य होते. गावित यांचा जनसंपर्क दांडगा होता, कार्यकर्त्यांमध्ये दादासाहेब नावाने ते लोकप्रिय होते. १९६५ साली त्यांनी ग्रामपंचायतीपासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली, नंतर धुळे जिल्हा परिषदेवर  निवडून गेले. १९८० साली नवापूर विधानसभा मतदार संघातून ते विजयी झाले होते. डॉ. मनमोहनसिंह यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री पदाची जबाबदारी पार पाडली, लोकसभेचे हंगामी अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. संसदेच्या विविध समित्यांचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. आदिवासी, वंचित, दलित समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी शेवटपर्यंत काम केले.

माणिकराव गावित यांच्या निधनाने सामाजिक आणि राजकीय क्षेत्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. गावित यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी गावित कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test