राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडाचे बारामती तालुक्यात आयोजन
बारामती - बारामती तालुक्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’चे आयोजन करण्यात येणार असून त्याचा शुभारंभ आज तहसिलदार विजय पाटील यांच्या हस्ते अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत निधीचे वाटप करुन करण्यात आला.
बारामती तालुक्यात माहे डिसेंबर २०२१ मध्ये झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे एकुण ३५ पशुधन मयत झाले होते त्यांची नुकसान भरपाई रक्कम ४ लाख ५४ हजार रुपये व ७७७ शेतकऱ्यांचे ४४२ हेक्टर ४१ आर एवढ्या बाधीत शेतीपिक/फळपिकांची नुकसान भरपाई रक्कम ७९ लाख ६९ हजार ७८० रुपये संबधीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरीत करण्यात आलेली आहे.
सेवा पंधरवडा कालावधीत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नवीन शासन निर्णयानुसार मदत निधीचे वितरण, नागरी सेवा केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या शासकीय सेवा, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अंतर्गत तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबीत असलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे, प्रलंबीत फेरफार नोंदीचा निपटारा करणे, पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वितरण करणे व नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देणे इत्यादी प्रलंबीत असलेल्या कामांचा निपटारा करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार पाटील यांनी दिली आहे.