'घरोघरी तिरंगा' या अभियानाअंतर्गत बारामती तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन - डॉ. अनिल बागल
बारामती : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून पंचायत समिती बारामतीच्यावतीने तालुक्यात 'घरोघरी तिरंगा' अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमात बारामती तालुक्यात ग्रामपंचायत स्तरावर राष्ट्रध्वजाची उपलब्धता करून देण्यात आली आहे. गावोगावी जेष्ठ नागरीकांच्या हस्ते फळ झाडे व वृक्षारोपण लागवड करण्यासाठी रोपांची वाटप करण्यात आले. घरोघरी राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी पंचायत समिती मार्फत गावपातळीवर जनजागृती करण्यात येत आहे.
महिला व बालकल्याण विभागातर्फे बाल गोपाळ पंगत, किशोरी मेळावा, महिला मेळाव्याचे आयोजन सुरु आहे. शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, वकृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व निबंध स्पर्धा यांचे शालेय स्तरावर आयोजन करण्यात येत आहे. आरोग्य विभागाकडून प्रत्येक उपकेंद्रात आरोग्य तपासणी शिबीर आयोजीत करण्यात येत आहे. तालुक्यात ‘स्वराज सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे, अशी माहिती गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल यांनी दिली आहे.