इंदापूर ! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कडून इंदापूरातील विविध विकास कामांचा आढावा...
( इंदापूर प्रतिनिधी आदित्य बोराटे )
संसद महारत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर तालुक्यातील विविध विकास कामांचा आढावा घेऊन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कामाचे भरभरून कौतुक केले आहे.
खासदार सुळे यांनी पुणे येथे सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या विविध विषयांवर बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुकाध्यक्षांची बैठक आयोजित केली होती,यामध्ये इंदापूर तालुक्यातील विकास कामांचा लेखाजोखा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर मांडला. यावेळी त्यांनी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कामाचे भरभरून कौतुक केले.
सुळे म्हणाल्या की, दत्तामामांनी अथक परिश्रम करून इंदापूर तालुक्याचा चेहरा मोहरा बदलला असल्याचे सांगून विकास कामांच्या बाबतीत भरणे मामा सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यांच्यातील काम करण्याचा आवाका हा वाखाण्याजोगा आहे,त्यामुळेच इंदापूरसाठी निधीची कमतरता भासत नाही.
_______________________________
चौकट - जलजिवन मिशनच्या कामावरून हर्षवर्धन पाटलांचा समाचार..
जलजिवन मिशनच्या कामाचा हर्षवर्धन पाटलांचा काहीही संबंध नसताना ते आपल्या कामाचे फुकटचे श्रेय घेत आहेत,अशी तक्रार पदाधिकाऱ्यांनी करताच खासदार सुळे म्हणाल्या की, त्यांना पहिल्यापासून "आयत्या बिळात नागोबा"अशाप्रकारची फुकटचे श्रेय घेण्याची जुनीच सवय आहे,त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा.जिल्हास्तरीय जलजिवन समितीचे अध्यक्ष अजितदादा तसेच या समितीत सदस्य म्हणून दत्तामामा कार्यरत होते,त्यांनी या योजनेसाठी मेहनत घेतली आहे.त्यामुळे ही कामे महाविकास आघाडीच्या काळातील असल्याने हर्षवर्धन पाटलांचा जलजिवन मिशनच्या कामाशी दुरान्वये संबंध नसल्याची टीका शेवटी त्यांनी केली.