पुणे जिल्हा परिषदेच्या दिव्यांग शोध मोहिमेअंतर्गत सव्वानऊ लाख घरांना भेटी
पुणे -पुणे जिल्हा परिषदेने दिव्यांग व्यक्तींना मदत आणि लाभ मिळावे म्हणून त्यांची ओळख पटविण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणात ग्रामीण भागातील सव्वानऊ लाख घरांना आशा कार्यकर्तीमार्फत भेटी देण्यात आल्या. सर्वेक्षणात ४ हजार ५३२ नवीन दिव्यांग व्यक्ती आढळून आले आहेत.
आशा कार्यकर्तींना अपंगत्वाची चिन्हे ओळखण्यासाठी तज्ञांमार्फत प्रशिक्षण देण्यात आले होते. आशा कार्यकर्त्यांनी ९ लाख २७ हजार घरांना भेटी दिल्या. भेटीदरम्यान घरातील अपंग व्यक्ती, अपंगत्वाचा प्रकार, वय आदी विविध बाबींची माहिती घेण्यात आली.
जिल्हा परिषद जिल्ह्यातील विविध ठिकाणी शिबिरे आयोजित करणार असून अपंगत्व आणि त्याची टक्केवारी तपासण्यासाठी आणि प्रमाणित करण्यासाठी अशा शिबिरांना वैद्यकीय मंडळ पाठवण्यात येणार आहे.
आशा कार्यकर्तीद्वारे अपंगत्व असलेल्या व्यक्तीचा शोध वैद्यकीय मंडळाने प्रमाणित केल्यास, आशा कार्यकर्तीला जिल्हा परिषद उपकरातून प्रति व्यक्ती २०० रुपये प्रोत्साहनपर रक्कम दिली जाईल. आशा कर्मचार्यांना सध्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रदान केलेल्या ६० सेवांसाठी असे प्रोत्साहन दिले जाते.
अपंग व्यक्ती प्रमाणित झाल्यानंतर जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्रामध्ये उपचारात्मक आणि शस्त्रक्रिया सेवांद्वारे आवश्यक सहाय्य प्रदान केले जाईल. श्रवणयंत्र, चष्मा, जयपूर फूट इत्यादी सहाय्यक उपकरणे विविध योजनांच्या माध्यमातून वितरित करण्यात येतील. याशिवाय दिव्यांग व्यक्तींना कौशल्य प्रशिक्षण, अपंग निवृत्ती वेतन, बस पास, विशेष नोकरी प्लेसमेंट समर्थन आदीचा लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
*आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे*-दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करताना त्यांच्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. दिव्यांग सर्वेक्षण मोहीम या प्रयत्नांचा पहिला टप्पा आहे. पुढील टप्प्यात त्यांना शासनाच्या विविध योजनांचा आणि आरोग्य सुविधांचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. आशा कार्यकर्तीनी केलेले सर्वेक्षणाचे काम कौतुकास्पद आहे.
चौकट....
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली १ ते १५ ऑगस्ट दरम्यान ही मोहीम राबविण्यात आली. ९९ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात २२ हजार ६३५ जुने दिव्यांग व्यक्ती आढळले असून त्यापैकी १८ हजार २५ व्यक्तींकडे अपंगत्व प्रमाणपत्र असल्याचे सर्वेक्षणात समोर आले. ४ हजार ५३२ नवीन दिव्यांग व्यक्ती आढळून एके असून त्यापैकी ९५० व्यक्तींकडे दिव्यांग प्रमाणपत्र आहे.