'घरोघरी तिरंगा' उपक्रमाअंतर्गत स्वयंसहाय्यता समुहाद्वारे तिरंगा ध्वज विक्री केंद्र
पुणे - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 'घरोघरी तिरंगा' (हर घर तिरंगा) उपक्रम राबविण्यात येणार असून त्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आवारात 'उमेद' स्थापित स्वयंसहाय्यता समुहाद्वारे आणि काही खाजगी विक्रेत्यांच्या माध्यमातून ५ ऑगस्ट रोजी तिरंगा ध्वज विक्री केंद्राची सुविधा असणार आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत कार्यरत स्वयं सहाय्यता समूह, ग्रामसंघ यांचेद्वारे जिल्हा परिषद पुणे कार्यालयाच्या आवारात तिरंगा ध्वज विक्री केंद्राचा शुभारंभ ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या हस्ते होणार आहे.
'घरोघरी तिरंगा' उपक्रमांतर्गत १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच सर्व शासकीय, निमशासकीय,खाजगी अस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करणे अपेक्षित आहे. नागरिकांनी तिरंगा स्वेच्छेने विकत घेण्यासाठी प्रेरित करण्यात येत आहे.
सर्व अधिकारी, कर्मचारी, नागरिक यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती परिसरातील केंद्रातून तिरंगा ध्वज खरेदी करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.