मोढवे येथील धक्कादायक घटना शुल्लक कारणाने सख्ख्या भावाचा कुऱ्हाडीने वार करत केला खून
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील मोढवे गावात सख्या भावाने आपल्या भावाची कुऱ्हाडीचा घाव घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेतात जाणाऱ्या वाटेवर लाकडी ओंडके का टाकले अशी विचारणा केल्यावरून भावानेच भावाची हत्या केली. तायाप्पा सोमा मोटे (वय ६० रा. मोढवे, मोटेवस्ती, ता.बारामती जि.पुणे) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मी महादेव मोटे (वय ३७ रा.मोढवे मोटेवस्ती ता.बारामती) यांच्या फिर्यादीवरून रामा सोमा मोटे (रा- मोढवे, मोटेवस्ती ता. बारामती) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामतीतील वडगाव निंबाळकर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीचे सासरे तायाप्पा सोमा मोटे याने भाऊ रामा सोमा मोटे यास तु शेतात जाणाऱ्या वाटेवर लाकडाचे ओंडके आढवे का टाकले आहे. अशी विचारणा केल्याच्या कारणावरूनच रामा सोमा मोटे याने त्याचा भाऊ तायाप्पा मोटे याला शिवीगाळ दमदाटी करत तु या रस्त्याने जायचे नाही "तुला आता जिवंत सोडणार नाही. तुला खल्लास करतो" असे म्हणून जिवे ठार मारण्याचे उद्देशाने रामा मोटे याने तायाप्पा मोटे याच्या हातातील कु-हाड हिसकावून घेत असताना तायाप्पा मोटे खाली पडला.
त्यावेळी रामा याने कुऱ्हाड हिसकावून घेऊन तायाप्पा मोटे याच्या डोक्यात मारत असताना ती कुऱ्हाड तायाप्पा मोटे यांनी हूकावल्याने त्यांच्या डोक्यात न लागता त्यांच्या डाव्या पायाला जोरात लागून गंभीर जखमी करुन जिवे ठार केले असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी घटनास्थळी भेट दिली सदर घटनेचा पुढील तपास एपीआय सोमनाथ लांडे करीत आहेत.