सेवादलातील सदस्यांसाठी मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम.
सेवादलातील मतदार म्हणून नाव नोंदणीसाठीची पात्रता
पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सेवादलातील मतदारांसाठी १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीच्या शेवटच्या भागात मतदार नोंदणीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.
शेवटच्या भागाची प्रारुप मतदार यादी ९ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. संबंधित रेकॉर्ड अधिकारी/ कमांडिंग अधिकारी वा प्राधिकाऱ्याकडून ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या कालावधीत अर्ज स्वीकारणे, अर्जाची पडताळणी आणि छाननी, पडताळणी केलेले आणि स्वाक्षरी केलेले अर्ज संबंधित अधिकाऱ्यांद्वारे अपलोड करण्यात येतील. स्वाक्षरी केलेल्या आणि पडताळणी केलेल्या अर्जासह एक्सएमएल फाईलवर आवश्यक कार्यवाही आणि अपूर्ण एक्सएमएल फाईल परत करण्याची कार्यवाही संबंधीत मतदार नोंदणी अधिकाऱ्याद्वारे २६ डिसेंबरपर्यंत करण्यात येईल.
सुधारीत एक्सएमएल फाईल्स व मतदार नोंदणी अर्ज संबंधित अधिकाऱ्यांकडून सादर करणे आणि त्यावर मतदार नोंदणी अधिकाऱ्याद्वारे अंतिम निर्णय घेण्याची कार्यवाही ३ जानेवारी २०२३ पर्यंत करण्यात येईल. मतदार यादीच्या शेवटच्या भागाची अंतिम प्रसिद्धी ५ जानेवारी २०२३ रोजी करण्यात येणार आहे.
सेवादलातील मतदार म्हणून नाव नोंदणीसाठीची पात्रता
मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम १९ मध्ये नमुद 'मतदार संघातील वास्तव्य' ही एक मूलभूत अट आहे. तथापि, अधिनियमातील कलम २० (३) नुसार सेवादलातील पात्रता असलेल्या व्यक्तीस तो जरी त्याच्या मूळ ठिकाणापेक्षा वेगळ्या ठिकाणी त्याच्या पदस्थापनेमुळे राहत असला तरी, सेवादलातील मतदार म्हणून त्याच्या मूळ ठिकाणी मतदार यादीत नाव नोंदविता येईल. अधिनियमातील कलम २० (८) नुसार सेवादलातील पात्रतेत सेनादलातील सदस्य, आर्मी ॲक्ट, १९५० ( १९५० चे ४६) मधील तरतुदी ज्यांना सुधारणा /सुधारणाशिवाय लागू आहे असे सेनादलातील सदस्य, राज्य सशस्त्र पोलीस दलातील राज्याबाहेर सेवा देत असलेले सदस्य आणि भारत सरकारच्या अखत्यारीतील असे कर्मचारी ज्यांची भारताबाहेर पदस्थापना आहे यांचा समावेश आहे.
सेवादलातील मतदारांची नावे प्रत्येक मतदारसंघाच्या मतदार यादीच्या शेवटच्या भागात नमूद करण्यात येतात. चारही संवर्गातील सेवादलातील मतदारांचे जोडीदार त्यांच्यासोबत सर्वसाधारणपणे रहिवाशी असतील तर मतदार यादीच्या शेवटच्या भागात सेवादलातील मतदारासोबत त्यांचे नाव नोंदविण्यास ते पात्र असतील.
सेवादलातील पात्र मतदार प्रकरण परत्वे नमुना अर्ज क्रमांक २, २अ किंवा ३ अन्वये मतदार नोंदणीसाठी अर्ज करु शकतात. हे अर्ज भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हे अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्वरुपात भरु शकतात.
मतदार यादीच्या शेवटच्या भागात नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने स्वतंत्र
http://www.servicevoter.nic.in
पोर्टल सुरु केले आहे. सेवादलातील पात्र मतदारांनी रेकॉर्ड ऑफिसर, कमांडिंग अधिकारी यांच्या माध्यमातून अर्ज दाखल करावे. मतदार यादीच्या शेवटच्या भागात नोंदणीसाठी ऑफलाईन अर्ज करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर नमुना अर्ज उपलब्ध आहे. भारत निवडणूक आयोगाने मतदार नोंदणी कायद्यात सुधारणा केल्यानुसार आता, सेवादलातील मतदार त्यांच्या स्वत:साठी आणि त्यांच्या जोडीदारासाठी अर्ज भरु शकतील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी कळविले आहे.