मोरगाव ! अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव देवस्थान मयुरेश्वर भाद्रपद यात्रा उत्सवसाठी सज्ज - विश्वस्त विनोद पवार
सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव येथील भाद्रपद यात्रा उत्सव रविवार दिनांक २८ ते गुरुवार दि १ सप्टेंबर या काळात संपन्न होत आहे. या उत्सवा निमित्ताने सर्व भावीकांना मुक्त द्वार दर्शनाचा लाभ पहाटे पाच ते दुपारी बारा वाजेपर्यंत घेता येणार असून मयुरेश्वरास स्वहस्ते जलस्नान व अभीषेक पुजा घालता येणार आहे.उत्सवाच्या निमित्ताने महापुजा, आरती , पदे , छबिना , टिपऱ्या आदी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन चिंचवड देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने केले असल्याची माहिती विश्वस्त विनोद पवार यांनी दिली.
मोरगाव येथील भाद्रपदी यात्रा उत्सव रविवार दि. २८ ऑगस्ट ते गुरुवार दिनांक १ सप्टेंबर या काळामध्ये संपन्न होणार होत आहे. या निमित्ताने चिंचवड देवस्थानच्या वतीने शेंदूरपुडा, छबिना, टिपऱ्या, महापूजा, श्रींचा विवाह अशा विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. यात्रा उत्सव काळात भाविकांना पहाटे पाच ते दुपारी बारा वाजेपर्यंत स्वहस्ते जलस्नान घालण्याची पर्वणी साधता येणार आहे. या यात्रेनिमित्ताने राज्यासह परराज्यातून हजारो भाविक श्रींच्या दर्शनासाठी येत असतात. मंदिराच्या चार दिशांना धर्म, अर्थ, काम, मोक्ष अशी चार द्वार मंदिर आहेत. या काळात द्वार ठिकाणी भाद्रपद प्रतिपदा ते भाद्रपद चतुर्थी काळामध्ये अनवाणी चालत जाऊन दुर्वा वाहण्याची विशिष्ट अशी प्रथा आहे. यंदा कऱ्हा नदीला पाणी असल्यामुळे गणेश कुंडात टॅंकरद्वारे कृत्रिम पाणी सोडावे लागणार नाही . भावीकांना गणेश कुंडातून पाणी घेऊन श्रीस जलाभीषेक घालण्याची पर्वणी साधता येणार आहे.
यात्रेनिमित्ताने मोरया गोसावी प्राप्त मंगलमूर्तीचा पालखी सोहळा चिंचवड येथून मंगळवार दि. ३० ऑगस्ट रोजी मोरगाव येथे सायंकाळी ७ वाजता येणार आहे . या पालखी सोहळ्याचे घरोघरी रांगोळ्या व फटाक्यांची आतषबाजी करत स्वागत करण्यात येते. तसेच पारंपारिक वाद्याच्या साह्याने मिरवणूक काढण्यात येते. या दिवशी रात्री नऊ वाजता मंगलमूर्ती व मयुरेश्वर भेट सोहळा संपन्न होतो. यात्रा कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले असून या काळामध्ये मयुरेश्वरास आदीलशाही काळातील पुरातन हिरे,माणिक, मोती, युक्त सुवर्ण अलंकार चढवण्यात येणार आहेत . हा पोशाख पाहण्यासाठी पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थ गर्दी करत असतात. यात्रेनिमित्ताने मोरगाव येथील भाद्रपद यात्रा विकास मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन भाद्रपद शुद्ध षष्ठीच्या दिवशी करण्यात येणार असल्याची माहीती मंडळाचे बबन तावरे यांनी दिली.
-----------------------------------------
यंदा तिथीचा क्षय नसल्याने दि २८ ऑगस्ट भाद्रपद शुद्ध प्रतीपदा ते दि १ सप्टेंबर भाद्रपद शुद्ध पंचमी या काळात मयुरेश्वरास पाच दिवस स्वहस्ते जलाभीषेक घालता येणार आहे. ग्रामपंचायत मोरगावच्या वतीने येणाऱ्या भावीकांसाठी प्रशस्त पार्कींग व्यवस्था , पिण्याचे पाणी व परीसर स्वच्छता ठेवली जाणार.
● सरपंच - निलेश केदारी ●