बारामती ! भिगवण येथील विनयभंगाच्या घटनेशी संबंधित आरोपीस शिक्षण आयुक्त यांनी तात्काळ निलंबित करावे-डॉ नीलम गोऱ्हे यांचे निर्देश
पुण :- इंदापूर तालुक्यात भिगवण येथील शालेय विद्यार्थिनींच्या विनयभंग प्रकरणातील आरोपी शिक्षकांवर भिगवण पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. शाळेतील अल्पवयीन मुलीचा तिच्याच शाळेतील शिक्षकाने विनयभंग करणे ही धक्कादायक घटना आहे. या घटनेची गंभीर दखल घेत आरोपी शिक्षकास तात्काळ निलंबित करावे असे निर्देश विधानपरिषदेच्या प्रभारी सभापती तथा उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी शिक्षण आयुक्तांना दिले आहेत.
डॉ.गोऱ्हे यांनी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांचेशी फोनवर चर्चा केली. शाळेचे मुख्याध्यापक व तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांच्यावरती हलगर्जीपणाबाबत तात्काळ कारवाई करण्यासंदर्भात निर्देशही त्यांनी पत्राद्वारे दिले आहेत. तसेच अशा घटना राज्यांतील शाळांमध्ये होऊ नयेत म्हणून शिक्षक आयुक्त यांनी सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण घ्यावे व त्यांना कडक सूचना निर्गमित कराव्यात, असे निर्देशही डॉ.नीलम गोऱ्हे यांनी श्री. मांढरे यांना दिले आहेत.
डॉ.गोऱ्हे यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याशी त्यांनी दूरध्वनीवर सविस्तर चर्चा करून मुलीचे समुपदेशन करून तिचे मनोधैर्य वाढवावे असे निर्देश दिलेले आहेत. या प्रकरणांमध्ये महिला पोलीस अधिकारी चौकशी अधिकारी म्हणून नेमावी, आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा होण्याच्या अनुषंगाने आवश्यक पुरावे गोळा करून ते कोर्टामध्ये सादर करावेत. आरोपीस जमीन मिळणार नाही याची ही काळजी घ्यावी अशाही सूचना डॉ. गोऱ्हे यांनी पोलिस अधीक्षक पुणे यांना दिल्या आहेत.