तृतीयपंथीयांसाठी सामाजिक सुरक्षा व कायदेविषयक चर्चासत्र संपन्न
पुणे, तृतीयपंथीय समुहातील घटकांसाठी सामाजिक सुरक्षा, आरोग्य, कल्याण, व्यवसाय प्रशिक्षण, स्वयंरोजगाराच्या संधी व कायदेविषयक हक्क व अधिकार याबाबत जनजागृती व्हावी यासाठी समाज कल्याण विभाग व सेंटर फॉर अॅडव्होकसी अॅण्ड रिसर्च संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चर्चासत्राला चांगला प्रतिसाद मिळाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजित चर्चासत्रात समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संगीता डावखरे, पुणे महापालिकेचे मुख्य समाज विकास अधिकारी रामदास चव्हाण, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अॅड. पल्लवी बाधणे आदी उपस्थित होते.
यावेळी श्रीमती डावखरे म्हणाल्या, तृतीयपंथी समूहातील नागरिकांसाठी विविध सामाजिक सुरक्षा योजना, तृतीयपंथी ओळखपत्र, आरोग्य योजना या मुद्द्यांवर जनजागृती करण्याची गरज असून यासाठी समाज कल्याण विभाग पुढाकार घेणार आहे. तृतीयपंथी व्यक्तींना सर्व प्रकारच्या सामाजिक सुरक्षा योजना आणि त्यासाठीची आवश्यक कागदपत्रे सुलभतेने उपलब्ध व्हावीत यासाठी 'एक खिडकी योजना' राबविण्यात येणार आहे.
श्री. बहाद्दरपुरे म्हणाले, महानगरपालिकेने तृतीयपंथी समूहासाठीच्या रोजगार व मोफत बस पास यासारख्या योजना सुरु केल्या आहेत. उद्यानांचे कामकाजही तृतीयपंथीयांच्या बचतगटांकडे सोपविले आहे. करवसुली पथकामध्येही तृतीयपंथीयांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
यावेळी बिंदूमाधव खरे मयुरी आळवेकर, झमीर कांबळे अॅड्. पल्लवी बाधणे, सोनाली दळवी, डॉ. केतकी घाडगे, रामदास चव्हाण, प्रशांत खताळ यांनीही मनोगत व्यक्त केले.
चर्चासत्रात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील पदाधिकारी, पुणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विविध विभाग, शिक्षण विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा कौशल्य व रोजगार विभागाचे अधिकारी आणि तृतीयपंथी समूहासाठी काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि सिफार संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.