खरंच कौतुकास्पद.... त्या गावातील विधवा महिलांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी देणार ध्वजारोहण अधिकार.
पुरंदर - पुरंदर तालुक्यातील पिसर्वे हे गाव राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खऱ्या अर्थी विधवा महिलांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आज आम्ही एका विशेष ग्रामसभेचे आयोजन करून विधवा प्रथा मोडीत काढण्याचा व त्याच विधवा महिलांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. याचे आज समाधान वाटत असल्याचे उदगार सरपंच बाळासाहेब कोलते यांनी काढले.
पिसर्वे (ता.पुरंदर) येथे आज एक विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेमध्ये परंपरेने चालत आलेली अनिष्ठ विधवा प्रथा मोडण्याचा निर्णय घेण्यात आला त्यावेळी सरपंच बाळासाहेब कोलते बोलत होते. यावेळी उपसरपंच मीना कोलते, माजी उपसरपंच अरुणा कोलते, सदस्य रविंद्र कोलते, महेश वाघमारे, चंद्रकांत कोलते, सुनिल कोलते, सदस्या योगिता कोलते, कविता कोलते, सुषमा कटके,शितल कोलते यांच्यासह ग्रामसेवक अमित टिळेकर, माजी सरपंच संभाजी कोलते, नवनियुक्त तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश कोलते आदींसह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आम्ही संवादी या संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीकांत लक्ष्मीशंकर यांनी उपस्थित गावकाऱ्यांसह महिलांना ही प्रथा बंद करण्यामागची कारणे व गरज याबाबत प्रबोधन केले. पिसर्वे ग्रामपंचायतीचा इतिहासातील या ग्रामसभेला पहिल्यांदाच महिला वर्गाने व गावकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. सरपंच बाळासाहेब कोलते यांनी मांडलेला ठराव व सदस्या योगिता कोलते यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व गावकऱ्यांनी हात उंचावत विधवा प्रथा मोडण्याचा ठरावाला संमती दिली.
दरम्यान हा ठराव बहुमताने मंजूर झाल्यानंतर उपस्थित सर्व विधवा महिलांना गावातील जेष्ठ नेते श्रीरंग वायकर व ग्रामपंचायतीच्या वतीने हळदी-कुंकू, बांगड्या, व साडीचोळी देऊन सन्मानीत करण्यात आले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
ग्रामपंचायतीने सुवर्णाक्षरांनी लिहावा असा निर्णय घेतला आहे. रूढी परंपरेने चालत आलेली विधवा प्रथा आज आम्ही मोडीत काढली आहे. याचा एक महिला म्हणून मला अभिमान वाटतो. इथून पुढील काळात आमच्या गावातील महिला पतीच्या निधनानंतर कपाळीचे कुंकू पुसणार नाही, तिच्या गळ्यातील मंगळ सूत्र तोडले जाणार नाही, तिच्या पायातील जोडवी उतरवली जाणार नाहीत. याची आम्ही काळजी घेऊ
--योगिता कोलते (सदस्या ग्रामपंचायत पिसर्वे)--
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
मी एक विधवा महिला आहे. आमच्या गावाने आज विधवा महिलांसाठी विधवा प्रथा बंद करण्याचा एक ऐतिहासिक निर्णय घेतला. आज सर्व गावासमोर आम्हाला हळदी कुंकू देऊन बांगड्या, साडी चोळी देऊन सन्मान केला. जिथे पतीच्या मागे आपलं कोण अशी चिंता होती तिथे. तिथे आज खूप बर वाटलं की आमच्यासाठी देखील कोणीतरी आहे. असे भावनिक उदगार त्यांनी काढले.
--- महिला रोहिणी सुर्यवंशी ---