राष्ट्रपती निवडणूक - २०२२ साठी जय्यत तयारी
निवडणूक पूर्वतयारीसाठी उच्चस्तरीय समितीची बैठक
मुंबई, राष्ट्रपती निवडणूक २०२२ साठी सर्व विभागांनी काटेकोरपणे नियोजन करून, सुरक्षा व्यवस्था, कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना, पासेसची व्यवस्था, नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना प्रवेश याबाबत सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश निवडणुकीच्या अनुषंगाने उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले.
विधानभवन येथे, राष्ट्रपती निवडणुक २०२२ पूर्वतयारी बैठकीत मुख्य निवडणूक अधिकारी श्री.देशपांडे बोलत होते. यावेळी विधीमंडळाचे प्रधान सचिव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत, सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. एन. रामास्वामी, विशेष पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था मिलिंद भारंबे, शासन मुद्रण व लेखन सामुग्री संचालनालयाचे संचालक रूपेंद्र मोरे, विद्युत कार्यकारी अभियंता सुनीता रावते, वाहतूक पोलीस उपायुक्त महेश पाटील, विधानभवन सुरक्षा व्यवस्थाप्रमुख अर्जुन शिवकुमार, गृह विभागाचे उपसचिव संजय खेडकर, आरोग्य सेवा संचालक डॉ.साधना तायडे, मुंबईचे विमानतळ सुरक्षा विभागाचे पोलीस उपायुक्त राज तिलक, नागरी विमान वाहतूक महानिदेशालयाचे प्रादेशिक उपायुक्त अशोक सातवसे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अवर सचिव सुभाष नलावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहायक अभियंता रेश्मा चव्हाण यावेळी उपस्थित होते.
मुख्य निवडणूक अधिकारी श्री.देशपांडे म्हणाले, राष्ट्रपती निवडणुकीकरिता दिनांक १८ जुलै,२०२२ रोजी सकाळी १० ते सायं. ५ वा.या कालावधीत विधान भवन, मुंबई येथे मतदान होणार आहे. या मतदानाच्या दिवशी आवश्यक सुरक्षाव्यवस्था गृह विभागाने द्यावी. राष्ट्रपती निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतपेटी व इतर साहित्य वाहनाने विधान भवन ते मुंबई विमानतळ (टर्मिनल-२) येथे नेण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सुरक्षा व्यवस्था तसेच वाहनासाठी विधान भवन, मुंबई ते मुंबई विमानतळ असा "स्वतंत्र मार्ग" राखीव ठेवावा जेणेकरून कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही.आरोग्य विभागाने या निवडणुकीसंदर्भात महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या कोविड-१९ प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य सेवक यांची नेमणूक करावी. सुरक्षा अधिकारी तसेच निवडणूक प्रक्रियेचे छायाचित्रण व व्हिडीओ चित्रीकरण करणारे प्रतिनिधी यांना विमानतळाच्या अंतर्गत भागात प्रवेश देण्याबाबत संबंधितांना विशेष प्रवेशपत्र देखील देण्यात यावेत, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी श्री.देशपांडे यांनी दिल्या.
विधीमंडळाचे प्रधान सचिव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत म्हणाले, छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण मुंबईने राष्ट्रपती निवडणुकीकरीता अधिकारी व मतपेटी यांची सुरक्षा विषयक तपासणी न होता थेट विमानात प्रवेश मिळण्याबाबत विमानतळ येथील नियुक्त अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात. शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबईने भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या सूचनांच्या अनुषंगाने मतदान कक्ष (आकार २१ x २१ x २१) तयार करावा, मतपेटीस लावावयाचे स्टीकर्स बनविणे, मतदारांकरिता सूचना देणारे फ्लेक्स बनविण्यात यावेत अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. अग्निशमन विभागाने अग्निप्रतिबंधक उपाययोजना व सार्वजनिक बांधकाम विभागाने स्थानिक ठिकाणची व्यवस्था तसेच विद्युत व्यवस्था सुरळीत ठेवण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी बैठकीत करण्यात आल्या.