Type Here to Get Search Results !

हर घर तिरंगा अभियानात लोकसहभाग घ्यावा- मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव

हर घर तिरंगा अभियानात लोकसहभाग घ्यावा
- मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव

            
मुंबई : स्वराज्य महोत्सव आणि हर घर तिरंगा उपक्रम अतिशय काटेकोरपणे राबविण्यात यावेत. या उपक्रमात लोकसहभाग घ्यावा, अशा सूचना मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी दिल्या.

            हर घर तिरंगा आणि स्वराज्य महोत्सव उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी आज बैठक झाली. मुख्य सचिव यांच्या दालनात झालेल्या बैठकीस गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार,  पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, सार्वजनिक बांधकाम विभाग सचिव सदाशिव साळुंखे आदी उपस्थित होते.

            हर घर तिरंगा आणि स्वराज्य महोत्सवातील विविध कार्यक्रमांचे नियोजन चांगले करावे. हर घर तिरंगा अभियानात ध्वज उपलब्ध करण्यासाठी नियोजन करावे. सामान्य नागरिकांना ध्वज खरेदी करण्यासाठी ठराविक ठिकाणे निश्चित करण्यात यावीत. या ठिकाणांबाबत नागरिकांना माहिती द्यावी, अशा सूचना मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी दिल्या.

            दोन्ही अभियानाबाबत व्यापक प्रसिद्धी करावी. त्यासाठी विविध विभागांच्या सहाय्याने जनजागृती करावी, अशा सूचनाही मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी दिल्या.

            हर घर तिरंगा अभियानाचे समन्वयक आणि ग्राम विकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी हर घर तिरंगा याबाबत सादरीकरण केले. त्यांनी हर घर तिरंगा अभियानासाठी ध्वज उपलब्ध करुन देण्यासाठी नियोजन करायला हवे. या अभियानाबाबत प्रचार प्रसिद्धी करावी. जिल्हास्तरीय समितीची बैठक घ्यावी, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर जिल्ह्यातील शासकीय अधिकारी कर्मचारी वसाहतीत सार्वजनिक बांधकाम विभागाने हर घर तिरंगा अभियान राबवावे, असेही त्यांनी सांगितले.

            सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी स्वराज्य महोत्सवाच्या बाबत माहिती दिली. यामध्ये ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधीत विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये हुतात्मा स्मारक सुशोभीकरण करणे, विविध प्रकारच्या स्पर्धा, पुरातत्त्व स्थळ, किल्ले येथील स्वच्छता आदी प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे, असे सचिव सौरभ विजय यांनी सांगितले. तसेच स्वराज्य महोत्सव अंतर्गत ग्राम, तालुका व जिल्हा पातळीवर संपन्न झालेले कार्यक्रम केंद्र शासनाच्या https://amritmahotsav.nic.in/ व राज्य शासनाच्या https://mahaamrut.org या संकेत स्थळांवर अपलोड करावेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

 

वारकऱ्यांच्या वाहनांना

टोल माफी मिळेल याची खात्री करावी

 

            पंढरपूरला आषाढी एकादशी यात्रेसाठी जाणाऱ्या वारकरी आणि भाविकांच्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यानुसार राज्यातील सर्व मार्गावरील राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग अथवा राज्य रस्ते विकास महामंडळ विभागाचा पथकर माफ करण्यात यावा. सर्व पथकर नाक्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूचना पोहोचल्या आहेत का याची खात्री संबंधित जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, परिवहन विभाग अधिकारी यांनी करावी. वारकरी आणि भाविकांच्या वाहनांना पथकर आकारण्याबाबत कसल्याही प्रकारची तक्रार येता कामा नये, अशा सूचना मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी दिल्या. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे  सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे यांनी सविस्तर माहिती दिली. सवलत देण्याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test