बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशन तर्फे "आरोग्यवारी"चे उद्या रविवार रोजी आयोजन .
४ गटामध्ये होणार्या या रिले रनमध्ये महाराष्ट्रातील सुमारे ७५० हून अधिक धावपटू सहभागी
बारामती - महाराष्ट्र राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते मा.अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनतर्फे " आरोग्यवारी " चे आयोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनचे संस्थापक , आयर्नमॅन सतिश ननवरे यांनी दिली .
" आरोग्यवारी " विषयी सविस्तर माहिती देताना सतिश ननवरे पुढे म्हणाले की,
"एक धाव दादांसाठी ही या आरोग्यवारीची मध्यवर्ती संकल्पना आहे. "माझा देश - माझा अभिमान... माझा नेता - माझा स्वाभिमान ..." ही या आरोग्यवारीची टॕगलाईन आहे. दादांवरील बारामतीकरांचे प्रेम सर्वश्रुत आहेच. आज राज्यात विक्रमी मताधिक्याने बारामतीकर दादांना निवडून देतात. हे त्याचेच द्योतक आहे. दादासुद्धा सकाळी ६:३० पासून कामाला सुरुवात करतात. वक्तशीरपणा , टापटीप आणि अखंड ऊर्जेच्या स्रोताने दादांचा वावर हा सर्वांसाठी प्रेरणादायी असतो. म्हणून दादांच्या निरोगी आरोग्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागृती करण्यासाठी प्रत्येक बारामतीकराने थोडे का होईना अंतर आरोग्यवारी मध्ये धावावे असे आवाहन त्यांनी केले. "
आरोग्यवारीच्या स्वरूपाविषयी माहिती देताना सतिश ननवरे पुढे म्हणाले की,
" आरोग्यवारी रविवार दिनांक २४ जुलै २०२२ रोजी होणार असून ४ गटामध्ये होणार्या या रिले रनमध्ये महाराष्ट्रातील सुमारे ७५० हून अधिक धावपटू सहभागी झाले आहेत.
आरोग्यवारी रिले रनचे हे तिसरे वर्ष असून मा.अजितदादा यांच्या शतायुषी आरोग्यासाठी तसेच नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी याचे आयोजन केले गेले आहे. पुण्यातील सारसबाग येथून रविवारी पहाटे ४ वाजता "आरोग्यवारी" ची सुरूवात होणार असून संध्याकाळी ६ वाजता शारदा प्रांगण, बारामती येथे याचा समारोप होणार आहे. १० किलोमीटर, २१ कि.मी., ५० कि.मी. आणि १०० कि.मी. अशा चार वेगवेगळ्या गटांमध्ये हि आरोग्यवारी होणार आहे. सारसबाग ते गाडी तळ, हडपसर या १० किलोमीटरच्या टप्प्यामध्ये पुण्यातील अनेक धावपटूंनी सहभाग नोंदविला आहे.
सारसबाग ते दिवेघाट माथा २१ किलोमीटर हा आरोग्यवारीचा दुसरा टप्पा असणार आहे. सासवड नगर परिषद येथे तिसरा टप्पा तर मल्हार ग्रँड, जेजुरी येथे चौथा टप्पा असणार आहे. जेजुरी येथे ५० किलोमीटर पूर्ण केलेल्या धावपट्टूचा सत्कार व पूढील धावपटुंसाठी अंतिम टप्प्याची सुरुवात असणार आहे. मोरगाव बस स्थानक, मोरगाव येथे पाचवा थांबा, मुल शिक्षण संस्था, कार्हाटी येथे सहावा थांबा तर कर्हावागज हा सातवा टप्पा असून शारदा प्रांगण, तीन हत्ती चौक, बारामती येथे आरोग्यवारीचा अंतिम टप्पा पूर्ण होणार असल्याची माहिती आयोजन कमिटीचे सदस्य रविंद्र थोरात, समीर ढोले, नाना सातव, गौतमभैय्या काकडे, रविंद्र पांडकर, अजिंक्य साळी, मच्छिंद्र आटोळे यांनी दिली.
अल्ट्रारनर व गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड खेळाडू प्रीती मस्के ही ६४ कि.मी. रनिंग करणार आहे , हॅप्पी फिट चॅम्पियनचे संस्थापक आणि मॅरेथॉन धावपटू अमित कुमार हे १०० किमी धावणार आहेत. तसेच लोकेश पाटील , राकेश कुमार , हेमंत पाटील , सुनील आगरकर, तामली बासू' औरंगाबाद चे सचिन घोगरे , साताऱ्याचे विशाल घोरपडे, मुंबईतील ६ आणि पुण्यातून १९ असे एकूण ३५ धावपटू १०० किमी रनिंग करणार आहेत. प्रत्येक गटातील धावपटूंना मेडल्स आणि प्रमाणपत्र मिळणार आहे. त्याचप्रमाणे "आरोग्यवारी" मध्ये सहभागी होणार्या सर्व धावपटूंना प्रमाणपत्र देण्यात येणार असून १०० किमी पूर्ण करणाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
अजितदादांवरील प्रेमापोटी सर्वसामान्य बारामतीकर आणि BSF चे सदस्य या आरोग्यवारी मध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहेत . या आरोग्यवारीच्या माध्यमातून एकूण ६३,०००० किमी सामूहिक रनिंग पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. या विक्रमाची नोंद २०२२ सालच्या " सर्वाधिक कि.मी. चा सार्वजनिक रिले रन " या अंतर्गत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये होणार आहे ."