पालखी सोहळा ! हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूल टाळ, मृदुंग आणि विठ्ठल नामाचा जयघोषात शाळा दुमदुमली.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूल, बारामती.
बारामती - हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूल, बारामती येथे टाळ, मृदुंग आणि विठ्ठल नामाचा जयघोष करीत संपूर्ण शाळा दुमदुमली.
आषाढी एकादशीचे औचित्य साधून आपल्या शाळेत पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी वारकरी वेशात अतिशय उत्साहात पालखी सोहळ्यात सहभागी झाले.
सर्व प्रथम श्री विठ्ठल रूक्मिणी यांची पूजा करून वारकरी विद्यार्थ्यांची माऊलींच्या जयघोषात पदयात्रा काढण्यात आली. यावेळी विद्यार्थी टाळ, मृदुंग वाजवत कपाळी गंध लावून तुळशीच्या माळा घालून अभंगात दंग झाले. इयत्ता १ली ते ९वी च्या विद्यार्थ्यांनी अभंगांचे गायन केले.
यावेळी विविध प्रकारच्या फुगड्या, वेगवेगळे खेळ खेळत हरिनामाचा जयघोष करीत सुखद अशा रिमझिमत्या पावसाच्या सरींचा सुखद अनुभव घेत पालखी सोहळा संपन्न झाला.
यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तसेच विद्यार्थ्यांनी शाळेची सजावट केली.या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली क्षीरसागर यांचे मार्गदर्शन लाभले.