नगरपंचायतीच्या गलथान कारभाराच्या निषेर्धात उपोषणाचा इशारा.
लोणंद, / प्रतिनिधी
अनेकदा निवेदने अर्ज देऊनही काम होत नसल्याने लोणंद नगरपंचायतीच्या भोंगळ कारभाराला कंटाळून सामाजिक कार्यकर्ते श्री. सत्वशील धैर्यशील शेळके (नाना) यांनी नगरपंचायत समोर उपोषणास (Hunger Strike) बसण्याचा इशारा दिला आहे.
लोणंद येथील विविध प्रभागातील समस्यांबाबत अनेकदा निवेदन देऊनही कसलीच कारवाई करण्यात येत नाही; जनहितार्थ दिलेले अर्ज, सोशल मिडियावरून केलेली आवाहने, बातम्यातून उठवलेला आवाज या सगळ्याकडे जाणूनबुजून नगरपंचायत प्रशासन डोळेझाक करीत असल्याचा आरोप लोणंद येथील माहीती अधिकार कार्यकर्ते सत्वशील शेळके (नाना) यांनी केला आहे. कचरा प्रोसिसिंग करण्याची नगरपंचायतीची साडेचार लाख किंमतीची मशीन जळाली त्याला जबाबदार कोण याची चौकशी करण्यात यावी यासंदर्भातील अर्जावर आजवर कसलीच कारवाई करण्यात आलेली नाही. कचरा उचलणाऱ्या गाड्यांची अनियमिता , अनेक ठिकाणची फुटलेली गटारे, पाण्याची गळती, अशा अनेक समस्यांवर दिलेल्या अर्जांवर नगरपंचायतीकडून हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप धैर्यशील शेळके यांनी केला आहे.
या संदर्भात योग्य चौकशी व्हावी अशी मागणी लोणंद येथील नागरीकांच्या सह्या असलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ही चौकशी १० ऑगस्टपर्यंत करून उचित कारवाई न केल्यास येत्या स्वातंत्र्यदिनी दिनांक १५ ऑगस्ट पासून आपल्या प्रतिनिधींसमवेत उपोषणास बसणार असल्याचे सत्वशील शेळके यांनी सांगितले.
याबाबतचे निवेदन लोणंद नगरपंचायतचे कार्यालय अधीक्षक शंकरराव शेळके यांना तसेच लोणंद पोलीस ठाण्यातही देण्यात आले आहे .