भोर ! भोर उपविभागात अर्धन्यायीक प्रकरणांचे कामकाज सकाळी ११ वाजेपासून सुरू होणार
णे - उपविभागीय अधिकारी भोर यांच्या समोरील अर्धन्यायीक प्रकरणांचे कामकाज १ ऑगस्ट महसूल दिनापासून भोर आणि वेल्हे येथे सकाळी ११ वाजेपासून सुरू होणार आहे.
उपविभागीय अधिकारी भोर यांच्या अधिनस्त भोर व वेल्हे हे दोन तालुके येतात. या दोन्ही तालुक्यातील कनिष्ठ महसूली न्यायालयांनी दिलेल्या निर्णयावर उपविभागीय अधिकारी भोर यांचेसमोर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अन्वये अपिल, पुनरिक्षण, पुनर्विलोकन तसेच मुंबई कुळवहिवाट शेतजमिन अधिनियम १९४८ अन्वये अपिल कामकाज, भूसंपादन अधिनियमातील हरकत अर्जाचे कामकाज सुरू असते. यापुर्वी अशा सुनावण्या दुपारी १२ वाजेपासून सुरू होत असत. प्रशासकीय कारणास्तव आणि पक्षकारांच्या मागणीनुसार १ ऑगस्ट महसूल दिनापासून यात बदल करण्यात येणार आहे.
भोर तालुक्यासाठी प्रत्येक मंगळवारी सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकारी भोर यांच्या कार्यालयात आणि वेल्हे तालुक्यातील सुनावण्या प्रत्येक शुक्रवारी सकाळी ११ वाजता तहसिल कार्यालय वेल्हे येथे सुरू होतील. सर्व संबंधित पक्षकार, विधिज्ञ, पुणे जिल्हा व भोर तसेच वेल्हे तालुका वकील संघटना (बार असोशिएशन) यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी केले आहे.