जलजन्य आजाराबाबत पावसाळ्यात घ्यावयाची काळजी
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे अनेक साथीचे रोग पसरतात. नकळत दूषित पाणी पिण्यात आल्यानेदेखील आजारांना सामोरे जावे लागते. अशुद्ध पाण्यामुळे जुलाब, उलटी, टायफॉइड, गॅस्ट्रो, विषाणू, जीवाणूंचे आजार व जंतूची वाढ यांसारखे आजार होतात. साथीचे आजार होऊ नये म्हणून नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
पावसाळ्यातील हे साथीचे आजार रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. साचलेल्या पाण्यावर फवारणी, आरोग्य तपासणी, पाण्याचे नमुने तपासणे आदी, पाण्यात औषध मिसळणे उपाययोजना स्थानिक स्वराज्य संस्थांतर्फे करण्यात येतात. त्याचबरोबर आपणही दक्षता घेतल्यास जलजन्य आजारांपासून दूर रहाता येते.
*जलजन्य आजारांची लक्षणे*
जुलाब, उलटी, अतिसार - वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ होण्याचे प्रमाण वाढणे किंवा ही दोन्ही लक्षणे असतात. पोटात ढवळणं, उलट्या, जुलाब ही या आजाराची लक्षणे आहेत. उलट्या, जुलाब यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन अशक्तपणा येतो.
टायफॉइड - दूषित पाण्याच्या संपर्कामधून याची लागण होण्याची शक्यता अधिक असते. टायफॉइड रुग्णामध्ये सुरवातीला हलका ताप असतो. नंतर तो १०३-१०४ डिग्री पर्यंत जातो. पोटात वेदना असतात. डोकेदुखी, अंगदुखी. थकवा येतो, अशक्त वाटते. भूक कमी होते. काही रुग्णांना छाती व पोटावर चपटे गुलाबी रंगाच्या ठिपक्यांचे पुरळ उठतात.
गॅस्ट्रो - गॅस्ट्रो अर्थात गॅस्ट्रोएन्ट्रायटिस. हा जीवाणूमुळे होणारा एक पचनसंस्थेचा साथीचा रोग आहे. या आजारात पोट दुखणे, जुलाब व उलट्या होणे, वारंवार पातळ संडास होणे, जुलाब व उलट्या झाल्यामुळे डीहायड्रेशन होणे (शरीरातील पाणी कमी होणे), भूक न लागणे, ताप, डोकेदुखी, ओटीपोटात दुखणे, पोटात मुरडा पडणे, चक्कर येणे तसेच अशक्तपणा वाटू लागणे अशी लक्षणे यात असतात.
विषाणू संसर्ग - ताप, खोकला, कफ आणि श्वास घ्यायला त्रास होणे ही या संसगार्ची मुख्य लक्षणे आहेत. या संसगार्ने आजारी असलेल्या व्यक्तीला कमालीचा अशक्तपणा, अंगदुखी, वेदना, नाक-छाती चोंदणे, घसा खवखवणे किंवा अतिसार यांसारखी लक्षणेही जाणवू शकतात.
जिवाणू व जंतूसंसर्ग - वातावरण बदलांमुळे अनेक वेगवेगळ्या जिवाणूची व जंतूची वाढ होते. हे जंतू माणसाच्या शरीरामध्ये श्वासातून, पाण्यातून, अन्नातून, स्पर्शातून गेले तर त्यांची त्या माणसाच्या शरीरात वाढ होऊ लागते आणि माणसाला आजार किंवा रोग होतो. उदा. मलेरिया, डेंग्यु, न्युमोनिया, कॉलरा, टी.बी. कावीळ इत्यादी. लक्षणे – ताप येणे, खोकला सर्दी-पडसे, तहान लागणे, तोंडाला कोरड पडणे स्नायूंमध्ये गोळे व अस्वस्थक वाटणे इत्यादी.
*जलजन्य आजार होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी*
शिळे आणि उघड्यावरील अन्न खाऊ नका. घरात आणि घराभोवती माशा होऊ नयेत यासाठी स्वच्छता ठेवा. साथीच्या काळात पिण्याचे पाणी उकळून थंड करून प्या. विशेषतः लहान मुले आणि गरोदर माता यांची काळजी घ्या. आपल्या गावातील परिसरातील पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण नियमित होत असल्याबाबत खातरजमा करा. ज्या ठिकाणी स्वच्छता पाळली जात नाही अशा हॉटेल किंवा इतर ठिकाणी खाणे, पाणी पिणे टाळा. बाहेरील बर्फ खाणे टाळा.
स्वयंपाक करण्यापूर्वी, जेवायला वाढताना किंवा जेवताना हात स्वच्छ धुवा. अन्न नीट झाकून ठेवा आणि ताजे अन्न घ्या. शौचावरुन आल्यावर, बाळाची शी धुतल्यावर हात साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवा. शौचासाठी शौचालयाचा वापर करा. पाण्याच्या स्रोताजवळ शौचाला बसू नका. घरात कुणाला उलट्या जुलाब होत असतील तर ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्या. जुलाब होत असतानादेखील ६ महिन्याखालील बाळाला अंगावरील दूध पाजणे थांबवू नका. रुग्णाला दवाखान्यात नेई पर्यंत ओआरएस द्रावण योग्य प्रमाणात पाजत रहा. लहान मुले, गरोदर माता आणि वृद्धांची विशेष काळजी घ्या. त्यांना साथ संपेपर्यंत उकळून गार केलेले पाणीच पिण्यासाठी द्या. घराबाहेर पडताना प्रवासात आपल्या सोबत पाणी ठेवा.
बारामती तालुक्यात साथ रोग सर्वेक्षण चालू केलेले असून प्राथमिक केंद्रांमध्ये पुरेसा औषध साठा उपलब्ध करून ठेवण्यात आलेला आहे. पावसाळ्यात सर्वांत जास्त आजार दूषित पाण्यामूळे होतात. योग्य खबरदारी घेतल्यास असे आजार टाळता येतात. आजाराची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरीत जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा
डॉ. मनोज खोमणे, तालुका आरोग्य अधिकारी-