पुणे विभागात वन महोत्सवाला सुरुवात;
‘क्लिन हिल्स, ग्रीन हिल्स’ च्या माध्यमातून वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम
पुणे : नागरिकांमध्ये वृक्ष लागवड जंगल वाचविण्याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी पुणे विभागात दरवर्षीप्रमाणे आजपासून वनमहोत्सवाची सुरूवात प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांच्याहस्ते गोखले नगर येथे मॅफको गार्डनमध्ये वृक्षारोपण करुन करण्यात आली.
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १ ते ७ जुलै या दरम्यान वनमहोत्सव साजरा करण्यात येतो. टेकड्यावर वृक्षलागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी २ जुलै रोजी या उपक्रमासोबतच ‘क्लिन हिल्स, ग्रीन हिल्स’च्या माध्यमातून 'वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम' राबविण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. सहभागी होण्यासाठी 9834528030 या क्रमाकांवर संपर्क साधावा.
मुख्य वनसंरक्षक श्री. प्रवीण म्हणाले, शहरात दिवसेंदिवस कार्बन डायऑक्साईडची भर पडत आहे. कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी वन विभागाच्यावतीने शहरात साधारणपणे ५० हजार वृक्ष तसेच विविध वनपरीक्षेत्रात सुमारे २ लाख वृक्ष लागवड करण्याचे पुणे वनविभागाचे उद्दिष्ट असल्याचे म्हणाले.
उपवनसंरक्षक श्री. पाटील म्हणाले, जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ४ व ५ जून रोजी पुणे वन विभागाच्या अखत्यारित असलेल्या विविध टेकड्यावरती ‘क्लिन हिल्स पुणे कॅम्पेन’ स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. आता यापुढे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी विविध टेकड्यावर हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे वनविभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.