Type Here to Get Search Results !

बारामती नगरपरिषदेचे 'माझी वसुंधरा अभियान २.०' मधील यश

बारामती नगरपरिषदेचे 'माझी वसुंधरा अभियान २.०' मधील यश
वातावरणीय बदलाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने  'माझी वसुंधरा अभियान २.०'  राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्यात आले होते. दुसऱ्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये   बारामती नगरपरिषदेने  राज्यात  नगरपरिषद गटात तिसरे  स्थान पटकावले.  

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती शहरातील  वृक्ष लागवडीवर नेहमीच भर असतो. सोबत पर्यावरणपूरक कामांवर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. बारामती नगर परिषदेने त्याबाबतचे चांगले नियोजन करताना स्पर्धेतील विविध पाच घटकांच्या संदर्भात चांगली कामगिरी केली आणि  नगरपरिषद वर्गवारीमध्ये  एकूण ५५०० गुणांपैकी ४८२२  गुण मिळविले. 

*वृक्षारोपण ते कचऱ्याचे विलगीकरण*
फोरम ऑफ इंडिया यांच्या मदतीने आणि लोक सहभागातून शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले. त्याचसोबत जुन्या शहरात अस्तित्वातील झाडांची, शहरातील बागांची निगा राखण्याचे काम नगर परिषदेच्या उद्यान विभागामार्फत सुरू आहे. शहरात नवीन रोपवाटिका तयार करण्यात आल्या.  वारसा वृक्ष गणना, वृक्ष गणना याकरीता  शहरातील शैक्षणिक संस्थांची मदत  घेऊन ही कामे करण्यात आली. घन कचरा व्यवस्थापन अंतर्गत ओल्या कचऱ्यापासून  बायोगॅस-वीज निर्मिती आणि कंपोस्ट खत बनविण्यासाठी प्रणाली उभी करण्यात आली.

सुका कचरा  विलगीकरण करून विविध खाजगी संस्थांना पुनर्प्रक्रियेकरीता देण्यात येतो. शहरात खाजगी संस्थेमार्फत थेट नागरिकांकडून प्लास्टीक खरेदी करून ते  पुनर्प्रक्रियेसाठी पाठविण्यात येते, यासाठी शहरात विविध ठिकाणी संकलन बुथ लावण्यात येतात. शहर स्वच्छता  करण्यासाठी चांगले योगदान देणाऱ्या नागरिकांचा स्वच्छतादूत म्हणून सन्मान करण्यात आला. 

*नदी सुधार प्रकल्प आणि कालवा सुशोभिकरण*
जल तत्व अंतर्गत कऱ्हा नदी सुधार प्रकल्प   राबविण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत नदीपात्रात गॅबियन वॉल बांधण्यात येत आहे याद्वारे नदीची वहन क्षमता वाढणार असून नदीकाठचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. नीरा डावा कालवा सुशोभीकरणाचेही काम सुरू असून त्यामध्ये सुमारे ६ किमी. लांबीचे अस्तरीकरण करून कालव्याच्या दोन्ही बाजूंचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्याच सोबत अस्तित्वातील दोन्ही साठवण तलावांची वेळोवेळी स्वच्छता करणे, शहरातील विहीरींचे  पुनर्जिवीकरण  आणि स्वच्छतेचे काम  करण्यात आले.

*शाश्वत ऊर्जेवर भर*
अग्नि तत्वाअंतर्गत नगरपरिषद कार्यालय इमारत, नगरपरिषद व्यावसायिक संकुल, प्रांत कार्यालय, भुमी अभिलेख कार्यालय, सिल्वर जुबिली हॉस्पिटल आणि इतर शासकीय कार्यालयांच्या इमारतींवर सौर पॅनल उभारण्यात आले आहेत. विजेवर चालणाऱ्या  वाहनांचा वापर वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात आली.  सौर ऊर्जेवर आधारीत  चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात आले.  जुन्या मुर्क्युरी व हॅलोजन दिव्यांच्या जागी वीज बचत करणारे एलईडी दिवे लावल्याने विजेची बचत होत आहे. अपारंपरिक ऊर्जास्त्रोताचा वापर वाढविण्याकरिता नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत आहे.

*प्रदूषण कमी करण्यासाठी सायकल वापराला प्रोत्साहन*
वायु तत्वाअंतर्गत शहरात वायु गुणवत्ता परीक्षण प्रणाली बसविण्यात आली. वायु गुणवत्ता निर्देशांक सुधारण्याकरिता विविध उपाय योजना करण्यात आल्या. शहरात जीवाश्म इंधंनावर चालणाऱ्या वाहनांचा वापर  कमी करून सायकलींचा वापर वाढवण्याकरिता संपूर्ण शहरातील मोठ्या रस्त्यांना सायकल पथ तयार करण्यात आले आहेत. बारामती सायकल क्लबच्या माध्यमातून सायकलच्या वापरास प्रोत्साहन देण्याकरिता व्यापक प्रमाणात जागृती करण्यात आली, त्यास चांगला प्रतिसाद मिळतो आहे. 

*पर्यावरणाची लोकचळवळ करण्याचे प्रयत्न*
पर्यावरण संवर्धन कायदा जन जागृती, विविध स्पर्धा आयोजित  करणे,  उपक्रमांचे आयोजन, शाळा महाविद्यालये यांच्या सहकार्याने व्यापक स्वरुपात जनजागृती करून लोक सहभाग मिळविण्यावर भर देण्यात आला आहे. पर्यावरण संवर्धनात विशेष योगदान देणाऱ्या  नागरिकांचा ‘पर्यावरण दूत’ म्हणुन सन्मान करण्यात आला. माझी वसुंधरा अभियानातील पंचतत्वांचा जास्तीत जास्त प्रचार करण्याकरिता पंचतत्व दर्शविणारे आकर्षक प्रचारस्थळे निर्माण करण्यात आली. ही प्रचारस्थळे शहरातील नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरत आहेत. 

बारामती शहराचा वेगाने विकास होत असताना तो शाश्वत असावा यायदृष्टीने पर्यावरणाचे महत्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा नगर परिषदेचा प्रयत्न आहे. त्यासाठीच विकासासोबत पर्यावरण ही संकल्पना घेऊन नगर परिषदेने विकासप्रक्रीया राबवली आहे. त्याला लोकसहभागाची जोड मिळाल्याने वसुंधरा अभियानात बारामती नगर परिषदेला यश मिळाले आहे.

*महेश रोकडे मुख्याधिकारी - माझी वसुंधरा अभियानात शहरातील नागरिक, सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये व सायकल ग्रुप यांचे सहकार्य लाभले. मिळालेल्या परितोषिकाने पुढील वर्षात माझी वसुंधरा अभियानात काम करण्यासाठी एक नवीन  ऊर्जा मिळाली आहे. शहरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद असल्याने पुढील वर्षीचे माझी वसुंधरा अभियान एक चळवळ होऊन बारामती नगर परिषद या वर्षापेक्षा चांगली कामगिरी करेल.*
-उप माहिती कार्यालय बारामती

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test