'निराधारां'साठी शासनाच्या विविध योजना
महाराष्ट्र शासनाकडून निराधारांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. समाजातील वृद्ध, अंध, अपंग व शारीरिक व मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, निराधार विधवा, परित्यक्त्या, अनाथ बालके, घटस्फोटिता, ३५ वर्षावरील अविवाहीत महिला, तृतीयपंती, वेश्या अत्याचारीत महिला, तुरंगामध्ये जन्मठेप शिक्षा भोगत असलेल्या आरोपींच्या पत्नी इत्यादी घटकांचे जीवनमान उंचावणे व सुसह्य होण्यासाठी शासनाकडून अर्थसहाय्य देण्यात येते.
*संजय गांधी निराधार योजना*
वय वर्ष १८ पर्यंतची अनाथ मुले, १८ ते ६५ वर्षे वयाच्या विधवा, निराधार, परित्यक्त्या, घटस्फोटीत महिला, ३५ ते ६५ वर्षे वयाच्या अविवाहित महिला, ० ते ६५ वर्षे वयाचे दिव्यांग (अंध, अस्थिव्यंग, मुकबधिर व मतिमंद) व दुर्धर आजार ग्रस्त (उदा. एच.आय.व्ही, क्षयरोग, पक्षपात, कर्करोग, कुष्ठरोग) यांना या योजनेचा लाभ घेता येतो.
अनाथ मुले, विधवा निराधार, परित्यक्त्या, घटस्फोटित व अविवाहित महिला, तृतीयपंथी, अत्याचारीत व दुर्धर आजारांच्या व्यक्तींसाठी कौटुंबिक उत्पन्न २१ हजारापेक्षा कमी असावे लागते. तर दिव्यांग व्यक्तींसाठी कौटुंबिक उत्पन्न ५० हजारापेक्षा कमी असावे लागते. या योजनेत लाभार्थ्यांना प्रतिमाह १
हजार रुपये अनुदान दिले जाते. विधवा परित्यक्त्या, घटस्फोटित महिलेस अपत्य असल्यास दोन अपत्याच्या मर्यादेत अपत्ये २५ वर्षाची होईपर्यंत प्रत्येकी १०० रुपये जादा अनुदान देय ठरते.
योजनेचा लाभ घेण्यासाठी वयाचा, तहसिलदारांचा उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी दाखला, अनाथांसाठी आई वडीलांचा मृत्यूचा दाखला व महिला व बाल कल्याण विकास अधिका-याचे पत्र व विधवा महिलांसाठी पतीच्या मृत्यूचा दाखला, शिधापत्रिका, मुलांचे जन्म दाखले, आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्राची छायांकित प्रत, मंडल अधिकारी तलाठी अहवाल व जबाब, अपंगासाठी ४० टक्के पेक्षा जास्त अपंगत्वाचे प्रमाणपत्र व दुर्धर आजारासाठी जिल्हा शल्य चिकित्सिक यांचे प्रमाणपत्र, परित्यक्त्यासाठी तलाठी व ग्रामसेवक यांचा दाखला, नगरपालिका हद्दीत तलाठी व कर निरीक्षक यांचा दाखला, घटस्फोटितासाठी सक्षम न्यायालयात घटस्फोटासाठी अपिल दाखल्याची प्रत, वेश्यांसाठी महिला व बालविकास अधिकारी यांचे वेश्या व्यवसायातून मुक्त झालेले प्रमाणपत्र, अत्याचारित महिलांसाठी जिल्हा शल्यचिकित्सक (सिव्हील सर्जन), महिला व बालविकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र व अत्याचाराबाबतची पोलिस स्टेशन गुन्हा नोंद व तृतीयपंथीसाठी सक्षम वैद्यकिय अधिकारी यांचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्र संबंधितांना तहसील कार्यालयातील संबंधित शाखेत सादर करावी लागतात.
*श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना*
वयोवृद्ध निराधार पुरुष व स्त्री यांच्यासाठी ही योजना लागू आहे. ज्यांचे वय ६५ वर्षावरील असेल, कौटुंबिक उत्पन्न मर्यादा २१ हजारांपर्यंत किंवा दारिद्र्य रेषेखालील असेल आणि ४० टक्के दिव्यांग व्यक्तींसाठी कौटुंबिक उत्पन्न मर्यादा ५० हजार असेल अशांना या योजनेचा लाभ घेता येतो. वृद्धांना या योजनेअंतर्गत रुपये १ हजार प्रतिमाह अनुदान देण्यात येते. वयाबाबतचा पुरावा, रेशनकार्ड व आधारकार्डची झेरॉक्स, नगरपंचायत/नगरपालिका/ग्रामसेवक यांच्याकडील दारिद्र्य रेषेखालील किंवा तहसिलदारांचा उत्पन्न दाखला व मंडल अधिकारी व तलाठी अहवाल व जबाब इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असते.