सदृढ महाराष्ट्र घडविण्यासाठी बालविवाह रोखण्याची मोहिम राबवा-राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर
पुणे, दि. 8: समाजातील वाढती बालविवाहाची कुप्रथा रोखणे हे सर्वांचे कर्तव्य असून सदृढ महाराष्ट्र घडविण्यासाठी बालविवाह रोखण्याची मोहिम प्रभावीपणे राबवावी, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने 'बेटी बचाव बेटी पढाओ' योजनेअंतर्गत बाल लिंग गुणोत्तर कमी असलेल्या गावातील पदाधिकाऱ्यांकरीता कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस सह आयुक्त संजय शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मितेश घट्टे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिराशे, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.
श्रीमती चाकणकर म्हणाल्या, महिला आयोगाच्यावतीने राज्यात बालविवाह, गर्भलिंग निदानचाचणी, स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी, विधवा, एकल महिला यांच्या समस्या आदींबाबत जनजागृती करण्यात येते. आयोग महिलांची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी कार्य करते. त्याचप्रमाणे बालविवाह रोखण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या कामामध्ये मध्ये गावपातळीवर सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्यांची महत्वाची भूमिका असून गावातील नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने कोणाच्या दबाबाला बळी न पडता बालविवाह आदी कुप्रथा रोखण्यासाठी संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.
श्री. प्रसाद म्हणाले, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, महर्षी धोंडो केशव कर्वे, बाया कर्वे यांनी महिलांच्या प्रगतीसाठी केलेल्या कार्याचा गौरवशाली इतिहास पुणे जिल्ह्याला आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या क्षेत्रात गर्भलिंग निदानचाचणी, स्त्रीभ्रूणहत्या, बालविवाह, रोखण्यासाठी प्रयत्न करावे. गावातील अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती यांनी प्रत्येक गर्भवती महिलांची नोंदणी करावी. यासाठी सरपंच, पोलीस पाटील यांनी लक्ष द्यावे. ग्रामपंचायतीच्या मदतीने सूचना बॉक्स उपलब्ध करुन देण्यात यावे. गावात भजनी मंडळाच्या माध्यमातून प्रबोधन करावे, असेही ते म्हणाले.
अप्पर पोलीस आयुक्त श्री. चव्हाण म्हणाले, सर्वांनी मिळून मनात संकल्प केला तर या प्रश्नावर मात निश्चित मात करता येईल. आपल्या परिसरात होणाऱ्या गर्भलिंग निदानचाचण्या, स्त्रीभ्रूणहत्या, बालविवाह याबाबत पोलीस प्रशासनाला माहिती दिल्यास निश्चितपणे अशा घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. समाजातील कुप्रथेस प्रतिबंध घालणाऱ्या मोहिमेस पोलीसांचे नेहमीच सहकार्य राहील, असेही ते म्हणाले.
अप्पर पोलीस आयुक्त श्री. घट्टे म्हणाले, समाजातील अशा चुकीच्या घटनांवर पोलीस विभागाचे लक्ष आहे. पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी प्रयत्न करुन आपल्या गावातील घटत्या स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तराला आळा बसेल याकडे लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले.
यावेळी चाईल्ड लाईन संस्थेचे पदाधिकारी, जिल्ह्यातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक आदी पदाधिकारी उपस्थित होते. बालविवाह रोखण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.