भवानीनगर ! जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे भवानीनगर येथे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले स्वागत
बारामती दि. २९ : पंढरीच्या ओढीने निघालेल्या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे हरिनामाच्या गजरात भक्तिमय वातावरणात आगमन झाले.
भवानीनगर येथे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पालखी रथ आणि दिंड्यांचे स्वागत केले. श्री. भरणे यांनी वारकऱ्यांशी संवाद साधून रथाचे सारथ्य केले व वारकऱ्यांसोबत फुगडी खेळली. तसेच वारकऱ्यांना वारीच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या सुखसमृद्धीसाठी विठ्ठलाकडे साकडे घातले.
गेली दोन वर्षे कोरोनाच्या संसर्गामुळे आषाढी पायी वारी रद्द करण्यात आली होती. यंदा कोणत्याही निर्बंधाविना वारकऱ्यांच्या अलोट गर्दीत वारी होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. अशीच वारी खंड न पडता पुढे चालू राहावी अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार श्रीकांत पाटील, गट विकास अधिकारी विजय कुमार परीट, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जीवन सरतापे, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जीवन सरतापे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ यांच्यासह पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
वारकऱ्यांनी खांद्यावर घेतलेल्या भगव्या पताका, महिलांनी डोक्यावर घेतलेले तुळशी वृंदावन व विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचे दृश्य व टाळ-मृदंगाच्या गजराने भवानीनगरमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
*पालखीसाठी बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन*
जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी आज सणसर मुक्कामी आहे. देहू,आळंदी, पंढरपूर व भंडारा डोंगर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत सणसर येथे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी तळावर बहुउद्देशीय सभागृह व संरक्षक भिंतीचे काम करण्यात आले आहे त्याचे उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न झाले.
या सभागृहामुळे पालखी ठेवण्यासाठीची प्रशस्त जागा मिळणार असून भाविकांनाही दर्शन घेण्यासाठी चांगली सोय होणार आहे.