सोमेश्वरनगर ! वाणेवाडी शाळेत रंगला वीस वर्षांनी सण २००२ चा माजी विद्यार्थी मेळावा.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील " न्यू इंग्लिश स्कूल " चे माजी विद्यार्थी
तब्बल वीस वर्षांनी एकमेकांना भेटले. इतक्या वर्षांनंतरही विद्यार्थी एकमेकांना ओळखू
शकले. आठवणींना उजाळा देण्यात दिवस सरला आणि परतताना माहेरवाशीणी सारख्या आलेल्या माजी विद्यार्थिनी भावुक झाल्या. ज्या शाळेने लिहायला वाचायला, वागायला, बेधडक आणि मोजके पण खरं बोलायला शिकवलं तिचे ऋण विसरून कसे चालेल.... म्हणून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी या विद्यालयाच्या मार्च २००२ च्या दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केला होता. कार्यक्रमाची सुरुवात विद्येचे दैवत सरस्वती आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे
पूजन करून करण्यात आली.दिनांक ५ जून रोजी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शाळेस झाडे देण्यात आली. अनेक माजी विद्यार्थी - विद्यार्थिनींनी मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा दिला.
शाळेची इमारत खोल्या, फळे, बोर्ड, पाण्याची टाकी, चिंचेच्या झाडांची बाग, खेळाचे मैदान, स्टेज, प्रयोगशाळा जसेच्या तसे पाहून अक्षरशः पस्तिशी गाठलेले माजी विद्यार्थी जणू पुन्हा विद्यार्थी बनले. या बॅचच्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर, शिक्षक,इंजिनिअर, शास्त्रज्ञ या क्षेत्रात भरारी घेतली आहे. भारावलेल्या वातावरणात माजी विद्यार्थाना अगदी दिवस संपल्याचेही जाणवले नाही. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विक्रम जाधव यांनी केले व आभार गणेश भोसले सर यांनी मानले. बबन जगताप सर, शैलेश जाधव, गणेश भोसले सर विक्रम जाधव, मोहन भोसले, डॉ. शितल जाधव ( कदम),
ज्योती माने (केवडे), यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते.